BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : एकाच रुग्णावर दुर्मिळ मेंदूविकाराच्या पाच शस्त्रक्रिया यशस्वी; आदित्य बिर्ला रुग्णालयाचे यश

रुग्णाची आर्थिक स्थिती पाहता रुग्णालयाचा मदतीचा हात; डॉक्टरांच्या परिश्रमामुळे रुग्णाला जीवनदान

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – चिंचवड येथील आदित्य बिर्ला रुग्णालयात दुर्मिळ मेंदूविकार झालेल्या एका रुग्णावर वेगवेगळ्या पाच यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. एका 35 वर्षीय रुग्णाला साता-याहून चिंचवड आदित्य बिर्ला रुग्णालयात आणण्यात आले. रुग्णाची अवस्था अत्यंत नाजूक असल्याने वेळ न घालवता तसेच पैशांचा विचार न करता रुग्णालयाने तात्काळ शस्त्रक्रिया केली. साडेतीन महिन्यांच्या डॉक्टरांच्या परिश्रमामुळे रुग्णाला जीवनदान मिळाले आहे. याबाबत डॉ. उर्वी शुक्ला, डॉ. राहुल पाटील, डॉ. संभाजी पवळ, डॉ. राकेश रंजन यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

यावेळी डॉ. राहुल पाटील म्हणाले, “35 वर्षीय रुग्ण हा सातारा येथे मेंढपाळ आहेत. एक दिवस अचानक त्यांच्या डोक्यात दुखू लागले. किरकोळ आजार समजून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. चार ते पाच दिवस त्यांनी वेदनाशामक गोळ्या खाल्या. ते एके दिवशी मेंढ्या घेऊन शेतात गेले असता त्यांना फीट आल्याने ते जमिनीवर कोसळले. यावेळी त्यांचे डोके एका दगडावर आपटले. त्यामुळे त्यांच्या मेंदूमध्ये अंतर्गत रक्तस्त्राव झाला. एका वाटसरूने त्यांना सातारा येथील एका रुग्णालय दाखल केले. रुग्णालयात प्राथमिक उपचार झाले. मात्र, आधुनिक सुविधांचा अभाव असल्याने त्यांना तात्काळ चिंचवड येथील आदित्य बिर्ला मेमोरियल रुग्णालयात हलविण्यात आले.

रुग्ण साता-यावरून येत असल्याने आणि रुग्णाची शारीरिक पार्श्वभूमी स्थानिक डॉक्टरांनी सांगितल्याने आदित्य बिर्ला मेमोरियल रुग्णालयातील डॉ. उर्वी शुक्ला, डॉ. राहुल पाटील, डॉ. संभाजी पवळ, डॉ. राकेश रंजन यांचे पथक सज्ज होते. रुग्णालयात दाखल करताना रुग्णाची अवस्था अत्यंत नाजूक होती. त्यांची शारीरिक स्थिती समजून घेण्यासाठी तात्काळ मेंदूचे स्कॅनिंग केले. त्यामध्ये मेंदूमध्ये अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याचे निदान झाले. मोठ्या प्रमाणात झालेल्या रक्तस्त्रावामुळे मेंदूच्या रक्तवाहिनीची स्थिती समजणे कठीण होते. त्यामुळे मेंदूच्या रक्तवाहिन्यांचे विशेष स्कॅनिंग केले. मेंदूच्या रक्तवाहिन्या फुगून त्या मेंदूच्या आजूबाजूच्या भागात रक्त सोडत असल्याचे दुस-या स्कॅनिंगमध्ये निदान झाले. त्यामुळे रुग्ण कोमात गेला. ब्रेन हॅमरेज होऊन मेंदूचा काही भाग निकामी होत होता. त्याचा परिणाम रुग्णाच्या श्वसनसंस्था आणि हृदयाला होण्याची भीती होती. त्यामुळे डी कॉम्प्रेसिव्ह क्रोनिओटॉमी ही अत्यंत महत्वाची शस्त्रक्रिया करण्यात आली. तसेच रुग्णावर डीएसए, अॅन्युरम कोइलिंग, इव्हिडी आणि क्रॅनिओप्लास्टी यांसारख्या पाच शस्त्रक्रिया टप्प्याटप्प्यात केल्या. काही शस्त्रक्रिया काही दिवसांपर्यंत सुरु होत्या.

आर्थिक परिस्थिती पाहून रुग्णावर मोफत उपचार
सुरुवातील एक आठवडा व्हेंटिलेटरवर, त्यानंतर तीन महिने अतिदक्षता विभाग आणि त्यानंतर सामान्य कक्षात असे एकूण सुमारे साडेतीन महिने रुग्ण तज्ञ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली होता. एवढ्या मोठ्या शस्त्रक्रिया आणि उपचार पद्धतीसाठी किमान तीस ते चाळीस लाख रुपयांचा खर्च आला असता, मात्र रुग्णाची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक असल्याने तसेच सामाजिक बांधिलकी जपत रुग्णालयाने रुग्णावर पूर्ण उपचार मोफत केले. रुग्णालयात उपचार घेण्यासाठी लागणा-या पैशांपेक्षा रुग्णालयाला रुग्णाचा जीव महत्वाचा होता. त्यामुळे सर्व डॉक्टरांच्या टीम रुग्णाला सर्वोत्तम उपचार देण्यासाठी प्रत्येक वेळी सज्ज होती.

डॉक्टरांमुळे मुलाची जगण्याची आशा वाढली
सध्या रुग्णाला घरी सोडण्यात आले असून सातारा येथील एका रुग्णालयात त्यांच्यावर नियमित उपचार सुरु आहेत. सातारा येथील डॉक्टरांना आदित्य बिर्ला रुग्णालयातील डॉक्टर वेळोवेळी मार्गदर्शन करत आहेत. जगण्याची उमेद हरल्यानंतर देखील डॉक्टर करत असलेल्या प्रयत्नांमुळे पुन्हा एकदा जगण्याची आशा वाढली. डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने माझा मुलगा माझ्याजवळ असल्याची भावना रुग्णाच्या आईने व्यक्त केली.

HB_POST_END_FTR-A2

.