_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Moshi: नाशिकफाटा ते मोशी रस्त्यावरील युटीलिटी शिफ्टींगच्या कामाचा सोमवारपासून सर्व्हे – डॉ. अमोल कोल्हे

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या पुढाकारातून आज (गुरुवारी) आयोजित केलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. : Survey of utility shifting work on Nashikphata to Moshi road from Monday - Dr. Amol Kolhe

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व पुणे मेट्रो या तीनही यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी नाशिक फाटा ते मोशी रस्त्यावरील युटीलिटी शिफ्टींगच्या कामाचा एकत्रित सर्व्हे येत्या सोमवारपासून सुरु करण्याचा निर्णय  घेण्यात आला.  शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या पुढाकारातून आज (गुरुवारी) आयोजित केलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

त्याचबरोबर उर्वरीत भूसंपादनाची प्रक्रियाही लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश डॉ. कोल्हे यांनी या बैठकीत दिले.

पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्र.60 (जुना क्र. 50) वरील नाशिक फाटा ते चांडोली या टप्प्याच्या सहापदरीकरणाचे काम मागील काही वर्षांपासून रखडले आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेकडून भूसंपादनासाठी होत असलेला विलंब, मेट्रो, बीआरटी मार्गासाठी सातत्याने करावे लागणारे बदल यामुळे या रस्त्याच्या कामास गती मिळत नव्हती.

त्यामुळे डॉ. कोल्हे यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना या रस्त्याचे काम दोन स्वतंत्र टप्प्यात करण्यासाठी विनंती केली होती. त्यानुसार नाशिक फाटा ते मोशी (इंद्रायणी नदीपर्यंत) व मोशी ते चांडोली असे दोन टप्पे करण्यात आले.

त्यापैकी मोशी ते चांडोली या रस्त्याच्या कामाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे नाशिक फाटा ते मोशी हे कामही लवकर सुरू करण्यासाठी आज खासदार डॉ. कोल्हे यांनी पिंपरी चिंचवड महापालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व पुणे मेट्रोच्या अधिकाऱ्यांची संयुक्त व्हिडिओ कॉन्फरन्स बैठक आयोजित केली होती.

_MPC_DIR_MPU_II

या बैठकीला पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त  श्रावण हर्डीकर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक  सुहास चिटणीस, पुणे मेट्रोचे डॉ. रामनाथ सुब्रह्मण्यम, मनोज दंडारे, नगररचना उपसंचालक  राजेंद्र पवार, सहशहर अभियंता (बीआरटीएस) श्रीकांत सवणे, कन्सल्टंट रोशन ढोरे आदी उपस्थित होते.

या महामार्गाच्या पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील रस्त्यासाठी 80 टक्क्यापेक्षा अधिक जागा ताब्यात आली आहे. त्यामुळे नियमानुसार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या टप्प्याच्या सहापदरीकरणाच्या कामाची टेंडर प्रक्रिया सुरू करु शकते, अशी सूचना डॉ. कोल्हे यांनी केली.

त्यामुळे या रस्त्यावरील ड्रेनेजलाईन, पाणीपुरवठ्याच्या लाईनसह सर्व युटीलिटी शिफ्टींगचे कामाचे इस्टिमेट तयार करणे, प्रस्तावित मेट्रो स्टेशन आदी कामांचा एकत्रित सर्व्हे केल्यास हे काम आठवडाभरात पूर्ण करण्याची डॉ. कोल्हे यांची सूचना मान्य करत आयुक्त हर्डीकर,  चिटणीस व डॉ. सुब्रह्मण्यम यांनी तीनही यंत्रणांचे एकत्रित सर्व्हेचे काम सोमवारपासून सुरु करण्यात येईल, असे सांगितले.

त्याचबरोबर उर्वरीत भूसंपादनाची प्रक्रियाही सुरू ठेवण्याचे मान्य करीत आयुक्त हर्डीकर यांनी त्यासाठी संबंधित मिळकतधारकांचे शिबिर घेण्यात येईल असे आश्वासन दिले.

या बैठकीत डॉ. कोल्हे यांनी पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प जवळपास मार्गी लागला असून या प्रकल्पाला जोडण्यासाठी क्रॉम्पिहेंसिव्ह मोबिलिटी प्लान तयार करून चाकण व वाघोली येथे मल्टिमोडल हब उभारणीबाबतही विचार करावा.  म्हणजे पिंपरी-चिंचवड हद्दीतील नाशिकला जाण्याऱ्या प्रवाशांची सोय होईल, असे डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

नोव्हेंबर अखेरपर्यंत या रस्त्याचे काम सुरू करण्याच्या दृष्टीने काम करायचे आहे. त्यामुळे 24 ऑगस्टला पुन्हा बैठक घेऊन कामाचा आढावा घेण्यात येणार असल्याचे डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.