PCMC News : लाच प्रकरणात अटक झालेला ‘सर्वेअर’ निलंबित; खातेनिहाय चौकशी सुरु

एमपीसी न्यूज – कंपनीच्या विकास योजनेचा अभिप्राय (ओपिनियन) देण्यासाठी तीन लाखांची लाच मागितल्या प्रकरणात अटक झालेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वेअरला निलंबित करण्यात आले आहे. त्याची खातेनिहाय चौकशी सुरु करण्याचे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी दिला आहेत.दरम्यान, 3 ऑगस्ट रोजी कारवाई होऊनही एसीबीकडून महापालिकेकडे माहिती आली नव्हती.त्यामुळे निलंबन कारवाईसाठी सात दिवसांचा विलंब झाला.

संदीप फकिरा लबडे असे निलंबित केलेल्या सर्वेअरचे नाव आहे.महापालिकेतील नगररचना विभागात ‘क’ दर्जाच्या पदावर लबडे कार्यरत आहे.ओपिनियन देण्यासाठी साडेतीन लाखांची लबडे याने लाच मागितली होती.तडजोडीअंती तीन लाखांची मागणी केली होती.तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार केली होती.एसीबीने 3 ऑगस्ट रोजी सापळा रचून महापालिका मुख्यालयातून लबडे याला अटक केली होती. पिंपरी पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता.शिवाजीनगर येथील विशेष न्यायालयाने लबडे याला दोन दिवसांची पोलीस कोठडी देखील सुनावली होती.

लबडे याने कर्तव्यात नितांत सचोटी, कर्तव्यपरायणता न ठेवता लोकसेवक म्हणून स्वत:च्या पदाचा, अधिकाराचा, दुरुपयोग करुन गुन्हेगारी स्वरुपाचे वर्तन केले.महापालिका कर्मचा-यास अशोभनीय ठरेल असे गैरवर्तन केल्याचे स्पष्ट होत आहे.लबडे याच्या या गैरवर्तनाने महापालिकेची जनमानसातील प्रतिमा मलीन झाली.लबडे याच्याविरोधात दाखल झालेला फौजदारी गुन्हा, 48 तासापेक्षा जास्त कालावधीकरिता अटक झाल्याने अटकेच्या दिनाकांपासून म्हणजेच 3 ऑगस्टपासून लबडे याला सेवानिलंबित करण्यात आले.लबडे याची विभागीय चौकशी सुरु करण्यात आली असून या आदेशाची लबडे याच्या सेवा पुस्तकात नोंद केली जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.