Pimpri : टिकणे हेच महाराष्ट्रातील सरकार समोर मोठे आव्हान – भाऊ तोरसेकर

एमपीसी न्यूज – किमान समान कार्यक्रम हा गुळगुळीत शब्द आणत वेगळ्या विचाराचे लोक एकत्र आले आहेत. भाजपला बाहेर बसविणे हाच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा किमान समान कार्यक्रम होता. आता तो पूर्ण झाला आहे. मुख्यमंत्री पंधरा दिवस खातेवाटप करू शकले नाहीत. त्यामुळे हे सरकार चालेल कसे?, महाराष्ट्रातील सरकार समोर टिकणे हेच मोठे आव्हान आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी व्यक्त केले. मंत्रिमंडळ ठरविता येत नाही. ते जनतेसाठी काय धोरण ठरविणार असेही ते म्हणाले.

चिंचवड देवस्थान ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि ग्रामस्थांच्या वतीने आयोजित श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सव देऊळमळा पटांगणावर सुरु आहे. महोत्सवात आज (शनिवारी) ‘विद्यमान सरकार समोरील आव्हाने’ या विषयावर तोरसेकर यांचे व्याख्यान झाले. यावेळी ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव, विश्राम देव उपस्थित होते.

तोरसेकर पुढे म्हणाले, शिवसेनेची ओळख काँग्रेस विरोधी पक्ष अशी होती. परंतु, शिवसेनेने आता ती ओळख पुसली आहे. त्यामुळे शिवसेनेचा तेलगू देसम होणार आहे. हिंदुत्वमुळे भाजप वाढला नाही. काँग्रेस विरोधातील मतांमुळे भाजपची वाढ झाली आहे. लोकांची मते ही सदिच्छा असतात. या सदिच्छा टिकवणे हे सरकार समोर आव्हान असते. डळमळीत सरकारे आव्हान टिकवू शकत नाहीत. आपले सरकार टिकवणे हा त्यांच्यावर बोजा असतो. सरकार बनविणे सोपे आहे. चालविणे कठीण आहे.

सरकार बनविणे अंकगणित असते. चालविणे बीज गणित असते. राज्यातील सरकार काँग्रेसच्या पाठींब्यावर बनले आहे. त्यामुळे चालविणे आणि टिकविणे कठीण आहे. आकड्यांची लोकशाही झाली आहे. पराभव झाल्यावर आत्मपरीक्षण केले जात नाही. नुकसान झाल्यावर प्रत्येक पक्षाने आत्मपरीक्षण करावे. सत्य नाकारू शकतात. पण, त्याचे परिणाम नाकारू शकत नाही. कार्यकर्ता पक्ष उभारतो. नेते आपल्या अहंकारापायी पक्ष बुडवितात, असेही ते म्हणाले.

तोरसेकर पुढे म्हणाले की, आता जनतेच्या प्रश्नांसाठी कोण भांडत नाहीत. कोणाला मुख्यमंत्री व्हायचे आहे. कोणाला गृहमंत्री व्हायचे आहे. पदांसाठी भांडत आहेत. सर्वसामान्य जनतेचे आयुष्य सुखकर करण्यासाठी सरकार काय करत आहे. नागरिकांच्या जीवनाशी निगडीत छोट्या-छोट्या गोष्टी सरकारने सोडविल्या पाहिजते. केंद्र सरकारने छोट्या गोष्टी अगोदर मार्गी लावल्या. त्यांनतर आता मोठी कामे हाती घेतली आहेत. मोठे निर्णय घेत असून आव्हाने पेलत आहेत. सरकार समोर फार मोठे आव्हान नसते. त्याकडे तुम्ही कसे बघता हे महत्वाचे आहे. आव्हाने पेलणारी, समस्यांना भिडणारी माणसे निर्माण झाली पाहिजेत. मग आव्हाने पेलता येतात. आव्हाने पेलणारी नेते निर्माण झाली पाहिजेत.

किमान समान कार्यक्रम काय असतो. त्यासाठी साधने लागत नाहीत. इच्छाशक्ती असावी लागते. जनतेची कामे करण्यासाठी सत्तेची गरज नसते. सरकारने किमान लोकांना आयुष्यात जगणे सुसह्य करावे. माज्या ताटातील चोरू नका हीच किमान अपेक्षा सामान्य लोकांची असते. जनतेला फूकट काहीच नको आहे. त्यांची कष्टाची तयारी आहे. त्यांना रोजगार पाहिजे, असेही तोरसेकर म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.