Sushant Death Anniversary: त्या सुशांत सिंहचं काय झालं?

एमपीसी न्यूज –  ( हर्षल आल्पे ) : संपूर्ण देशात काही महिने सर्वाधिक चर्चेत राहिलेले सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण पुढील काही महिन्यांतच विस्मृतीच्या पडद्याआड गेले. 14 जून 2020 ला सुशांतचा मृतदेह मुंबईतील त्याच्या राहत्या घरी आढळून आला. त्याला आज बरोबर एक वर्ष झाले. सुशांतच्या स्मृतीदिनानिमित्त हर्षल आल्पे यांचा विशेष लेख..

सामना या 1960-70 च्या दशकात आलेल्या बहुचर्चित मराठी सिनेमात प्रस्थापित नेता असणाऱ्या निळू फुले यांना समाजाने बेवडा आणि वेडा ठरवलेल्या श्रीराम लागू साकारत असणारे पात्र जेव्हा जेव्हा “त्या मारुती कांबळेचं काय झालं?” असं विचारते, तेव्हा तेव्हा मदमस्त असणारे, कशाचीही पर्वा न करणारे राजकीय नेते म्हणून अस्वस्थ होतात.तो “मारुती कांबळे”ही त्यांच्या कुठल्याशा पापाचा जिवंत एकमेव साक्षीदार असतो, त्याला या मुजोर सत्ताधीशाने अलगद आपल्या रस्त्यातून हटवलेला असतो.

समाजात छुपेपणाने या कृत्याच्या विरोधात चर्चा ही असते, हीच चर्चा लागू ऐकतात, सुरवातीला तो राजकीय नेता दुर्लक्ष करण्याचे बेगडी ढोंग रचतो मात्र आतून तो अस्वस्थ होतच असतो, त्याला सहज शक्य असतं प्रश्न विचारणाऱ्याला संपवणे, पण याला संपवून त्याची शक्ती कुठेही सिद्ध होत नसते, कारण हा म्हणजेच लागू यांचे पात्र समाजाच्या दृष्टीने टाकाऊ आणि राजकीय दृष्टीने निरुपद्रवीच असते…

आज सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला एक वर्ष पूर्ण झाले. अजूनही ती आत्महत्या होती की हत्या याचे गूढ तपासयंत्रणांना उकललेलं नाही, हे वास्तव आहे. या वर्षभरात वेगवेगळ्या बातम्या आल्या आणि अचानक बंद ही झाल्या, एनसीबी (नार्कोटिक्स डिपार्टमेंट) ची ड्रग्ज संदर्भात चाललेली कारवाई वगळता अजून काही ठोस हाती लागलेले नाही.लोकं खासगीत चर्चा करतात आणि सोडून देतात, पण पुढे काय? एक जीव गेला, तो जीव गेल्यानंतर तो अत्यंत घाणेरड्या राजकारणाचा बळी ठरला.. बिहार निवडणुकीवेळी जवळ जवळ सर्वच पक्षांनी त्याचा प्रचारात वापर केला.

खरं तर सुशांत बिहारहून असंख्य स्वप्नं घेऊन मुंबईत मायानगरीत उतरला असेल त्या वेळी त्याने हा विचारही केला नसेल की, तो एका गलिच्छ राजकारणाचा बळी ठरेल. त्याला कल्पनाही नसेल की, हे राजकारण त्याच्या स्वत:च्या अभिनय क्षेत्रापासून सुरु होऊन पार निवडणूक आणि राजकीय पक्षांपर्यंत सगळ्या गोष्टी पार ढवळून काढेल.या प्रकरणात सुरुवातीला तपासाच्या पातळीवर आघाडीवर असलेली टीव्ही माध्यमं हळूहळू माघार
‌घेऊ लागली.

अशातच संवेदनशील मनांना असा प्रश्न या निमित्ताने सतावतो की, असं काय आहे या सुशांतच्या प्रकरणात, की जिथे गप्प बसणे हाच न्याय आहे?सुशांतसारख्या शास्त्रीय दृष्टीने हुशार आणि आजच्या पिढीतल्या मुलाचे असे काय चुकले होते की, सीबीआयसारख्या केंद्रीय यंत्रणेलाही पारदर्शकपणे अजून काही घोषित करता येत नाहीये, कायद्यापुढे तर सर्व समान आहेत ना? मग आम्हाला निरपेक्ष तपास करायला अडचण का येते आहे?‌आणि मग जर येणाऱ्या तरुण पिढीतील प्रतिनिधी लागू यांच्या “त्या” भूमिकेत शिरुन विचारु लागली की, त्या सुशांतचे काय झाले? तर काय उत्तर देणार आहोत? त्या वेळी कदाचित विचारणार्याला संपवूही शकणार नाही.

आत्महत्या की हत्या, या प्रश्नाचे उत्तर आता तरी मिळावे आणि ती जर हत्या असेल तर सुशांतमधल्या माणसाचा सन्मान म्हणून ते लगेच जाहीर करावे.‌या सगळ्यातून सुशांतचे खरे मारेकरी जगासमोर यावेत आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, तीच खरी सुशांत सिंह राजपूत या माणसाला, मनस्वी अभिनेत्याला खरी आदरांजली असेल..

(लेखाचा उद्देश फक्त यावर विचार व्हावा आणि योग्य कृती व्हावी एवढाच, हीच खरी भावांजली!)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.