Sushant Singh News: पवना धरणातील एका बेटावर व्हायच्या झिंगाट पार्ट्या, सुशांत बरोबर रिया,सारा प्रमाणेच श्रद्धा कपूरचाही सहभाग?

'त्या' बेटावर नेऊन आणण्यासाठी मोटारबोट चालकाला मिळायचा तब्बल 16 हजारांचा मलिदा

एमपीसी न्यूज – पवना धरणाच्या जलाशयातील आपटी-गेव्हंडे गावाजवळील एका बेटावर चित्रपटक्षेत्रातील कलाकारांच्या झिंगाट पार्ट्या चालायच्या अशी माहिती पुढे आल्याने खळबळ उडाली आहे. आत्महत्या केलेला अभिनेता सुशांत सिंह राजपूत हा वेगवेगळ्या अभिनेत्रींबरोबर त्या बेटावर गेल्याची माहिती एका मोटारबोट चालकाने अंमली पदार्थ विरोधी विभागाला (एनसीबी) दिली आहे. रिया चक्रवर्ती, सारा अली खान नंतर आता या प्रकरणात श्रद्धा कपूर हिचे नावही पुढे आले आहे.

अभिनेता सुशांतसिंग मृत्यू प्रकरणी दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. पवना धरण परिसरातील ‘हँग आऊट व्हिला’ या फार्महाऊसवर सुशांत सिंह विश्रांतीसाठी यायचा. त्यामुळे एनसीबीच्या पथकाने गेल्या आठवड्यात त्या फार्महाऊसची झाडाझडती घेतली होती. त्यानंतर पवना धरणात बोटींचा व्यवसाय करणाऱ्या जगदीश दास नावाच्या व्यक्तीकडून नवीनच माहिती एनसीबीला मिळाली आहे.

पवना धरणाच्या जलाशयातील एका बेटावर सुशांत जायचा. त्या ठिकाणी पोचवून परत आणण्यासाठी प्रत्येकवेळी जगदीश दास याला तब्बल 16 हजार रुपयांचा घसघशीत मोबदला मिळायचा. या पार्ट्यांना सुशांत बरोबर आतापर्यंत रिया चक्रवर्ती, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांनी हजेरी लावली असल्याचे त्याने एनसीबीला सांगितल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.

जगदीश दास हा गेली कित्येक वर्षे पवना डॅम येथे मोटारबोट चालविण्याचे काम करतो. दोन वर्षांपूर्वी अब्बास आणि रमजान अलीने जगदीशला फोन करून बंगल्यावर बोलवून घेतलं होतं. त्यावेळी पवना धरणात बोटींग करायचे असल्याचे सांगून त्याने जगदीशची मोटारबोट भाड्याने घेतली होती.

त्यावेळी अब्बास अलीबरोबर सुशांतसिंह राजपूत पहिल्यांदा जगदीशच्या मोटारबोटवर आला होता. जगदीशनं केलेल्या या कामासाठी त्यांनी त्याला तब्बल 16 हजार रुपयांची रोकड दिली होती. त्यानंतर पुढे सुशांतने अनेक वेळा पवना धरणातील एका बेटावर जाण्यासाठी जगदीशची मोटारबोट वापरल्याची माहिती पुढे आली आहे.

कोणती अभिनेत्री सुशांत बरोबर या बेटावर किती वेळा आली होती याचा तपशील देखील जगदीशने एनसीबीला दिला आहे. या बेटावर अंमलीपदार्थ सेवनाबाबत काही पुरावे मिळतात का, याबाबत एनसीबी पथकाकडून तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.