Rhea Chakraborty’s Profile: कोण आहे ही रिया चक्रवर्ती ?

sushant singh rajput case: Rhea Chakraborty's profile बंगाली वडील आणि कोकणी आईच्या पोटी 1 जुलै 1992 ला जन्मलेल्या रियाचा जन्म बंगळुरु येथे झाला. तिचे बालपण हरियाणातील अंबाला येथे गेले.

एमपीसी न्यूज – बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर जणू काही संपूर्ण भारतच ढवळून निघाला आहे. माध्यमांवर तर सुशांत विषयीच्या बातम्यांचा सतत उहापोह सुरु आहे. दररोज त्यात नवनवीन खुलासे होत असून सामान्य लोकदेखील कोरोनाकाळात या बातम्या आवडीने वाचत आहेत. सुशांतच्या मृत्यूला रिया चक्रवर्ती जबाबदार असल्याचा आरोप सुशांतचे वडील के के सिंह यांनी केला असून तिच्या विरोधात पाटण्यात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. आता ही रिया चक्रवर्ती कोण आहे याची माहिती जाणून घेऊया.

बंगाली वडील आणि कोकणी आईच्या पोटी 1 जुलै 1992 ला जन्मलेल्या रियाचा जन्म बंगळुरु येथे झाला. तिचे बालपण हरियाणातील अंबाला येथे गेले. इंद्रजित आणि संध्या चक्रवर्ती यांच्या घरी जन्मलेल्या रियाने अंबालाच्या आर्मी पब्लिक स्कूलमधून आपले शिक्षण पूर्ण केले.

रियाचे वडील सैन्यात डॉक्टर आहेत तर आई गृहिणी आहे. रियाला एक भाऊ आहे त्याचे नाव शौविक आहे. या चौघांवर सुशांतच्या कुटुंबाने आत्महत्या, गुन्हेगारी कट, चोरी, फसवणूक आणि धमकी दिल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला आहे.

रियाने एमटीव्हीच्या रिअॅलिटी शो ‘टीन दिवा’च्या माध्यमातून ग्लॅमरच्या जगतात पाऊल ठेवले. त्यामध्ये ती फर्स्ट रनर अप ठरली. त्यानंतर तिने दिल्लीतील एमटीव्हीची व्हिडिओ जॉकी होण्यासाठी ऑडिशन दिले आणि तिची निवड झाली.

रियाने व्हीजे असताना ‘एमटीव्ही वास्सअप’, ‘कॉलेज बीट’ आणि ‘एमटीव्ही गॉन इन 60 सेकंड्स’ होस्ट केले. यात काळात तिला अभिनेत्री व्हावे असे वाटू लागले. खरं तर तेव्हा ती अभियांत्रिकी शिकत होती. पण तिला अभियंता होण्यात काही रस नव्हता म्हणून तिने अभियांत्रिकी सोडली आणि अभिनयाकडे वळली.

अभिनेत्री होण्यासाठी रियाने खूप मेहनत घेतली. यशराज फिल्म्सच्या 2010 मध्ये आलेल्या ‘बॅंड बाजा बारात’साठी रियाने ऑडिशन दिले होते. पण मुख्य भूमिकेसाठी तिला नाकारले गेले होते. पुढे या चित्रपटात अनुष्का शर्माला रोल मिळाला आणि तिच्या करियरने सुसाट दिशा घेतली.

रियाला तिचा पहिला ब्रेक 2012 मध्ये आलेली तेलगू फिल्म ‘तुनेगा तुनेगा’ च्या माध्यमातून मिळाला होता. या चित्रपटात तिने निधी नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती. हा चित्रपट फ्लॉप ठरला पण त्यानंतर 2013 मध्ये लवकरच रियाला बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळवला. तिला फिल्म ‘मेरे डॅडकी मारुती’ मध्ये जसलीनची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. पण हा चित्रपटही फ्लॉप ठरला.

2014 मध्ये रियाचा आलेला तिसरा चित्रपट ‘सोनाली केबल’ हा देखील सुपरफ्लॉप ठरला. याचा परिणाम असा झाला की, तिला तीन वर्षे घरात बसून राहावे लागले. 2017 मध्ये तिला ‘हाफ गर्लफ्रेंड’ आणि ‘दोबारा: सी योर ईविल’ सारख्या चित्रपटंमध्ये कॅमियो मिळाला. मात्र हे चित्रपटही फ्लॉप ठरले.

यानंतर 2017 मध्ये आलेल्या ‘बँक चोर’ आणि 2018 मध्ये आलेल्या ‘जलेबी’ मध्ये रियाला मुख्य अभिनेत्री म्हणून भूमिका साकारण्याची संधी मिळाली. यामध्ये ती अयशस्वी ठरली. यानंतर रिया कोणत्याच चित्रपटात दिसलेली नाही.

रियाने आजवर एकूण आठ चित्रपटांमध्ये काम केले. तरीदेखील तिचे फिल्मी करिअर यशस्वी होऊ शकले नाही. रिया आणि सुशांतसोबत रुमी जाफरी एक चित्रपट बनवण्याचे प्लानिंग करत होते. या चित्रपटाचे शूटिंग याच वर्षी मे महिन्यात सुरु होणार होते. मात्र लॉकडाऊनमुळे असे होऊ शकले नाही. आता सुशांत गेल्यानंतर हा चित्रपट कधीच बनू शकणार नाही.

28 वर्षांच्या रियाच्या गेल्या दोन वर्षांच्या इन्कमटॅक्स रिटर्नवर नजर टाकली तर तिचे वार्षिक उत्पन्न 10-15 लाख रुपयांच्या जवळपासच आहे. मात्र तिच्या जवळ मुंबईमध्ये कोट्यवधींची संपत्ती आहे. ही प्रॉपर्टी रियाने कशी बनवली या प्रकरणी ईडी तपास करत आहे. रियावर सुशांतच्या 15 कोटींची हेराफेरी केल्याचा आरोप आहे.

रियाच्या प्रत्येक चित्रपटाचे मानधन लक्षात घेता असे दिसले की, आजवर 25-30 लाखांपेक्षा जास्त पैसे तिला दिले गेलेले नसतील. तर ब्रँड एंडोर्समेंटसाठी म्हणजेच जाहिरातींसाठी रियाला 3 लाख ते 5 लाख रुपये मिळतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.