Sushant Case: वडिलांच्या दुसऱ्या विवाहामुळे सुशांत नाराज होता- संजय राऊत

Sushant singh Case: Sushant was upset over his father's second marriage, says shiv sena leader mp Sanjay Raut वडिलांनी केलेला दुसरा विवाह सुशांतने स्वीकारला नव्हता. वडिलांबरोबर त्याचे भावनात्मक संबंध राहिले नव्हते.

एमपीसी न्यूज- सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूवरुन राजकारण तापताना दिसत आहे. या प्रकरणावरुन मुंबई आणि बिहार पोलिसांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. आता हे प्रकरण महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. याप्रकरणी शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी अनेक प्रश्न उपस्थित करत गंभीर आरोपही केले आहेत. शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’मध्ये बिहार पोलीस आणि केंद्र सरकार महाराष्ट्र सरकारविरोधात कट रचत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. बिहारचे डीजीपी भाजपचे कार्यकर्ता असल्यासारखं काम करत असल्याचे त्यांनी म्हटले. इतकंच नव्हे तर सुशांतच्या वडिलांनी दुसरा विवाह केल्यामुळे बाप-लेकातील संबंध बिघडले होते, असेही आपल्या लेखात म्हटले आहे.

संजय राऊत पुढे म्हणाले की, सुशांतचे कुटुंबीय पाटणा येथे राहत असत. त्याचे आपल्या वडिलांबरोबर चांगले संबंध नव्हते. वडिलांनी केलेला दुसरा विवाह सुशांतने स्वीकारला नव्हता. वडिलांबरोबर त्याचे भावनात्मक संबंध राहिले नव्हते. त्याच्या वडिलांना भरीस पाडून बिहारमध्ये एफआयआर दाखल करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर काही तासांत मुंबईमध्ये तपास पथक पाठवण्यात आले.

दरम्यान, सुशांतचे मामा आरसी सिंह यांनी संजय राऊत यांचे वक्तव्य फेटाळले आहे. सुशांतच्या वडिलांनी दुसरे लग्न केले नव्हते हे सर्वांना माहीत आहे. संजय राऊत चुकीचे वक्तव्य करत असल्याचे त्यांनी म्हटले.

राऊत पुढे की, मुंबई पोलिसांवर आरोप करुन बिहार सरकारने केंद्राकडे सीबीआय चौकशीची मागणी केली. 24 तासांच्या आत ही मागणीही मान्य करण्यात आली. राज्याच्या स्वायत्ततेवर हा थेट हल्ला आहे. सुशांतचे प्रकरण आणखी काही वेळ मुंबई पोलिसांच्या हातात असले असते तर आकाश कोसळले नसते. हे दबावाचे राजकारण आहे. सुशांत प्रकरणाची आधीच पटकथा लिहिण्यात आली होती.

मुंबई पोलिसांची तपास यंत्रणा जगातील सर्वोत्तम तपास यंत्रणा आहे. मुंबई पोलीस दबावाला कधीच बळी पडत नाही. ते व्यावसायिक आहेत. शीना बोरा हत्याकांडापासून ते 26/11 दहशतवादी हल्ल्याला मुंबई पोलिसांनी उत्तर दिले आहे. मजबूत पुरावे गोळा करुन कसाबला फासावर लटकवले. सुशांतसारख्या प्रकरणात केंद्राने हस्तक्षेप करुन मुंबई पोलिसांचा अपमान केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.