Sushilkumar Shinde : सत्ता बदलाच्या काळात गांधी विचार विसरू नये  : सुशीलकुमार शिंदे

एमपीसी न्यूज – सत्ताबदलाच्या काळात आज आपण गांधी, नेहरू, शास्त्री विसरत चाललो आहोत. गांधी- नेहरूंची काँग्रेस आता कमी झाली आहे. अशा परिस्थितीत महात्मा गांधींच्या प्रेरणेतून सर्वधर्मसमभाव आचरणात आणला पाहिजे. गांधी स्मारक निधी, युक्रांदने त्यात योगदान देत राहावे, अशी अपेक्षा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी तर्फे आयोजित ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहा’चे उद्घाटन शनिवारी (दि.1) सायंकाळी सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे सचिव अन्वर राजन, विश्वस्त एम.एस.जाधव ,रमेश कुंडूसकर, नोएल माजगावकर, जांबुवंत मनोहर,नीलम पंडित, अप्पा अनारसे, पल्लवी भागवत, मीना साबद्रा,मौलाना इसाक, ग्यानी अमरजीत सिंग ,फादर पीटर व्यासपीठावर उपस्थित होते.

Navdhara : सरकारचे शैक्षणिक धोरण हे संशोधन उपक्रमांना चालना देणारे : डॉ. मनोहर चासकर

पुण्यात गांधीभवन येथे 1  ते 7 ऑक्टोबर  दरम्यान या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. भजन, शांती मार्च, व्याख्याने, खादी वस्तूंचे प्रदर्शन असे कार्यक्रम या गांधी सप्ताहात होणार आहेत. गांधी सप्ताह आयोजनाचे हे 11 वे वर्ष आहे. गांधी भवन आवारात खादी ,हातमाग आणि विविध गृहोपयोगी वस्तूंचे स्टॉल्सचे प्रदर्शन  2 ऑक्टोबर पर्यंत  सकाळी 11 ते रात्री 9 या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.

पुढे बोलताना शिंदे (Sushilkumar Shinde) म्हणाले की, राष्ट्रभक्ती आणि जातीयता निर्मूलनाचे काम देशात महात्मा गांधींनी केले. त्यांच्या प्रेरणेने नेहरूंनी समाजवादी समाजरचना आणली. गरीबी श्रीमंतीची दरी कमी होत नाही. लोकसंख्या वाढीने प्रश्न अजून जटील  होत आहे. अशा वेळी गांधी विचार विसरून चालणार नाही.

महात्मा गांधींनी आफ्रिकेतील कारकिर्दीपासून समाजसेवा सुरू केली. कॉंग्रेसमध्ये, देशात त्यांनी सेवाभाव, अस्पृश्यता निर्मूलन रुजविले. त्यांच्याच सर्व धर्मसमभावाच्या प्रेरणेने युवक क्रांती दल, डॉ. कुमार सप्तर्षी कार्यरत आहेत, असेही शिंदे यावेळी बोलताना म्हणाले.

शांती मार्च, व्याख्याने

रविवार दि. 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंती आणि जागतिक अहिंसा दिनाच्या निमित्ताने सकाळी 8 वाजता शुभांगी मुळे आणि सहकाऱ्यांचा प्रार्थना आणि भजनाचा कार्यकम होणार आहे. याच दिवशी लोकमान्य टिळक पुतळा (महात्मा फुले मंडई) ते सेनापती बापट पुतळा (अलका टॉकीज चौक) या मार्गावर दंगलमुक्त पुण्याचा संदेश घेऊन सकाळी साडेआठ वाजता ‘शांती मार्च’ काढण्यात येणार आहे. पुणे शहर कायम दंगामुक्त राहावे, या  संकल्पासाठी हा शांती मार्च काढण्यात येणार आहे.

गांधी जयंती निमित्त सकाळी दहा ते दुपारी तीन दरम्यान  सर्वांकरीता प्रसाद भोजन आयोजित करण्यात आले आहे. लहान मुलांसाठी जादूगार संजय रघुवीर यांचे जादूचे प्रयोग दुपारी 4 वाजता होतील.

सोमवार 3 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता ‘संसदीय लोकशाहीचे भवितव्य ‘ या विषयावर संविधान अभ्यासक डॉ उल्हास बापट  यांचे व्याख्यान होणार आहे.

Navratri Walk : इंडो अथलेटिक सोसायटीतर्फे नवरात्री वॉक आणि रन चे आयोजन

4 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता ह.भ.प. शामसुंदर सोन्नर महाराज यांचे कीर्तन होणार आहे.

गुरुवार,6 ऑक्टोबर रोजी  सायंकाळी सहा वाजता पर्यावरणवादी कार्यकर्ते बंडू धोत्रे (चंद्रपूर) यांचे व्याख्यान होणार आहे.

शुक्रवार,7 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे (संपादक,लोकमत,पुणे ) यांच्या उपस्थितीत सप्ताहाचा समारोप कार्यक्रम होणार आहे.

शांती मार्च वगळता सर्व कार्यक्रम महाराष्ट्र गांधी स्मारक निधी ( गांधी भवन,कोथरुड ) येथे होणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.