Pimpri : सार्वजनिक शौचालय अस्वच्छ आढळल्यास आरोग्य निरीक्षकाला निलंबित करा; महापौरांचा आयुक्तांना आदेश 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक शौचालये स्वच्छ ठेवण्यात यावीत. नादुरुस्त शौचालये दुरुस्त करण्यात यावीत. आरोग्य निरीक्षकांनी दररोज पाहणी करुन शौचालयाच्या स्वच्छतेवर लक्ष ठेवावे.  साफ-सफाई न केल्यास ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात यावे. सार्वजनिक शौचालये अस्वच्छ आढळल्यास संबंधित आरोग्य निरीक्षकाला तडकाफडकी निलंबित करण्यात यावे असा आदेश महापौर राहुल जाधव यांनी आयुक्तांना दिला. तसेच नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील शौचालये अस्वच्छ असल्यास त्याचे छायाचित्र व्हॉटसअॅपवर पाठविण्याचे आवाहन त्यांनी केले. 

महापालिकेच्या आज (बुधवारी)झालेल्या सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेवर स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचा अवलोकनाचा प्रस्ताव होता. शौचालय बांधणीच्या या विषयावर अनेक नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील शौचालयाच्या अस्वच्छतेच्या समस्या मांडल्या.

महापौर राहुल जाधव म्हणाले, प्रत्येक नगरसेवकाच्या प्रभागात विविध समस्या आहेत. त्या समस्या मार्गी लावाव्यात. सर्व प्रभागातील सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता ठेवण्यात यावी.  नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील शौचालय अस्वच्छ असल्यास त्याचे छायाचित्र आपल्या व्हॉटसअॅपवर पाठवावे. त्याचक्षणी आरोग्य निरीक्षकाला निलंबित केले जाईल. शहरातील नादुरुस्त असलेली शौचालय तातडीने दुरुस्त करण्यात यावीत. स्वच्छता न ठेवणा-या संबंधित अधिका-यांवर कारवाई करण्यात यावी.

शौचालयांची साफ-सफाई न केल्यास ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात यावे. वायसीएमएच रुग्णालयातील शौचालय अतिशय अस्वच्छ आहेत. तेथील शौचालयाची साफसफाई करण्यात यावी. त्याचे काम करणा-या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे. नाल्यांची साफसफाई करावी. नाल्यात सोडला जाणारे मैलापाणी बंद करुन ड्रेनेजमध्ये सोडावे, असे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले.

आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, आत्तापर्यंत स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत शहरात 14 हजार शौचालये बांधली आहेत. त्यामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. महापालिकेने कोणताही खर्च न करता सीएसआरफंडातून 5 हजार शौचालये बांधून घेतली आहेत. प्रभाग अधिका-यांनी प्रभागातील शौचालयांची स्वच्छता होतो की नाही याकडे लक्ष द्यावे. नियमितपणे शौचालयांची साफसफाई करुन घ्यावी. पाणी उपलब्ध करुन द्यावे. पुर्नप्रक्रिया केलेले पाणी शौचालयाच्या वापरासाठी उपलब्ध करुन द्यावे. शौचालय अस्वच्छ आढळल्यास आरोग्य निरीक्षकावर निलंबनाची कारवाई केली जाईल.

पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन!

पवना धरणात केवळ 15 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. चार आठवडे पुरेल एवढेच पाणी आहे. त्यामुळे सर्वांनी पाण्याचा जपून वापर करावा. वाहने धुणे, उद्यानासाठी पिण्याचा पाण्याचा वापर टाळावा. पाईपलाईनचे लिकेज पाणीपुरवठा विभागाने तत्काळ दुरुस्त करावेत. अनधिकृत नळजोडांवर धडक कारवाई करण्यात यावी. दुषित पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी, अशा सूचना आयुक्त हर्डीकर यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिका-यांना केल्या.

नगरसेवक एकनाथ पवार, दत्ता साने, सचिन चिखले, राहुल कलाटे, तुषार कामठे, तुषार हिंगे, नगरसेविका मंगला कदम, आशा शेंडगे, माई ढोरे यांनी या चर्चेत सहभाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.