Pune News : चोरांना पाहून पळ काढणाऱ्या ‘त्या’ पोलिसांवर निलंबनाची कारवाई

एमपीसी न्यूज : मुद्देमाल घेऊन समोरून चोरटे जात असतानाही त्यांना अटकाव करता स्वतः पळून जाणाऱ्या पुणे पोलीस दलातील त्या दोन पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. औंध येथील सोसायटीत 28 जानेवारीच्या पहाटे घडलेला प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला होता. या घटनेचा सीसीटीव्ही सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाल्याचा ठपका ठेवत या दोघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली

पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी या संदर्भातील आदेश काढला आहे. पोलीस हवालदार प्रवीण रमेश गोरे आणि पोलीस नाईक अनिल दत्तू अवघडे अशी या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, औंध येथील शैलेश टॉवर या सोसायटीत शिरलेल्या चोरांची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दिली होती. माहिती मिळाल्यानंतर दोन पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखलही झाले. परंतु त्यांनी या चोरांना रोखले नाही किंवा त्यांना पकडण्याचा प्रयत्नही केला नाही. उलट त्यातील एक कर्मचारी चोरांना पाहून पळून गेला.

या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी कर्तव्य करीत असताना केलेला निष्काळजीपणा, बेजबाबदारपणा आणि भित्रेपणा यामुळे पोलिस खात्याची जनमानसातील प्रतिमा मलिन करणारी असल्यामुळे या दोघांनाही शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.