Nashik News : दस्त गहाळ प्रकरणी कर्मचार्‍याचे निलंबन

एमपीसी न्यूज : नाशिक कार्यालयातुन पुण्यातील आयजीआर कार्यालयाकडे नेण्यात येणारे दस्त चोरीस गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संबंधीत कर्मचार्‍याला तात्काळ निलंबीत केले असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली. दरम्यान, आयजीआरचे पथक नाशकात दाखल झाले असून त्यांच्याकडून या प्रकरणाचा तपास सुरु झाला आहे.

देवळा तालुक्यात बनावट मुद्रांकांवर खोटे दस्तऐवज तयार करून शेतजमिनीचा व्यवहार केल्याचा प्रकार अलीकडेच उघडकीस आला आहे. याशिवाय जिल्ह्यात मालेगावसह अन्य काही ठिकाणी देखील अशा प्रकारे फसवणूक झाल्याच्या तक्रारी आहेत.

या पार्श्वभुमीवर तब्बल ४० हजार दस्त तपासून घेण्याचे काम सुरूच असताना आता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील दुय्यम निबंधक कार्यालयातील काही महत्वपुर्ण कागदपत्रे पुण्यातील मुद्रांक व नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाकडे (आयजीआर) घेऊन जात असताना चोरीला गेल्याचा अजब प्रकार पुढे आला आहे. कारची काच फोडून ही कागदपत्रे चोरीस गेल्याचे संबंधित कर्मचार्‍याकडून सांगण्यात आले.

महत्वपूर्ण कागदपत्रे पुण्यात पोहोच करण्यासाठी विश्वासाने संबंधित कर्मचार्‍याकडे सुपुर्द करण्यात आली होती. ती काळजीने पोहोच करणे ही या कर्मचार्‍याची जबाबदारी होती. परंतु ही महत्वपूर्ण कागदपत्रे व्यवस्थित न सांभाळल्याने त्या कर्मचार्‍याला निलंबित करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया

दस्त गहाळ  प्रकरणाचा तपास सुरु असून ते न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे सध्या या विषयावर काहीही बोलणे उचित ठरणार नाही.

कैलास दवंगे, मुद्रांक जिल्हाधिकारी नाशिक

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.