एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षणासाठी (Swachh Bharat Mission) लाखो रुपये खर्च करूनही केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात शहराच्या रँकिंगमध्ये (क्रमवारीत) सुधारणा झालीच नाही. शहराचा देशात 19 वा क्रमांक आला आहे. गतवर्षीही देशात 19 वाच क्रमांक होता. त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षणातील शहराची परिस्थिती ‘जैसे थे’ आहे.  दरम्यान, राज्यात चौथा क्रमांक आला असून ‘सिटीझन फीडबॅक’मध्ये (सर्वोत्तम नागरिक अभिप्राय) शहराचा प्रथम क्रमांक आला आहे. ही समाधानकारक बाब मानली जात आहे. “स्वच्छ सर्वेक्षण 2022” चा आज (शनिवारी) दिल्लीत निकाल जाहीर झाला.

सर्वोत्तम नागरिक अभिप्राय यात 10 लाख ते 40 लाख लोकसंख्येच्या विभागात देशातील प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने पिंपरी-चिंचवडला गौरविण्यात आले. केंद्रीय नगरविकास राज्यमंत्री कौशल किशोर, केंद्रीय नगरविकास सचिव मनोज जोशी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. महापालिका आयुक्त शेखर सिंह, आरोग्य विभागाचे उपायुक्त अजय चारठणकर, उपायुक्त रविकिरण घोडके, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, आरोग्य कर्मचारी गोकुळ भालेराव  उपस्थित होते.

5G Internet : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीमध्ये 5G इंटरनेट सेवेचं लोकार्पण

केंद्र सरकारच्या वतीने देशात स्वच्छ सर्वेक्षण अभियान (Swachh Bharat Mission) राबविण्यात येत आहे. 10 लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या विभागात (कॅटेगरीत) पिंपरी-चिंचवड शहर सहभागी झाले होते. व्यापक स्वरुपात नागरिकांचा व समाजातील सर्व स्तरांचा सहभाग स्वच्छ भारत अभियानामध्ये घेणे, लोकांच्या वर्तनातील बदल घडवणे, या सर्वेक्षणाचा प्रमुख हेतू होता. पिंपरी-चिंचवड शहरात एप्रिल- मे या कालावधीत स्वच्छ सर्व्हेक्षण 2022 अभियान राबविण्यात आले होते. त्यासाठी महापालिकेने मोठ्या प्रमाणात जनजागृती केली होती.

स्वच्छ सर्वेक्षण 2022 अंतर्गत महापालिकेतर्फे विविध पातळ्यांवर जनजागृती आणि उपक्रम सुरु करुन स्वच्छाग्रह मोहीम प्रभावीपणे कार्यान्वित केली होती. विविध मोहिमा राबविल्या. ओला, सुका कचरा वर्गीकरणावर भर दिला. सर्वेक्षणावर लाखो रुपयांचा खर्च केला.

तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी शहर स्वच्छतेसाठी मोठे परिश्रम घेतल्याचे सांगत स्वच्छतेमध्ये शहराचा पहिल्या पाचमध्ये क्रमांक येण्याची महापालिकेला आशा होती. परंतु, निकालात शहराच्या रँकिंगमध्ये सुधारणा झाली नाही. 2021 प्रमाणे यंदाही देशात शहराचा 19 वाच क्रमांक आला आहे. तर, राज्यात 4 क्रमांक आला आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2022 मध्ये” सिटीझन फीडबॅकमध्ये शहर अव्वलस्थानी आहे हीच समाधानकारक बाब आहे.

सात वर्षांपासून ‘रँकिंग’चा आलेख चढता, उतरता!

मागील सात वर्षांपासून स्वच्छ सर्वेक्षणातील (Swachh Bharat Mission) पिंपरी-चिंचवड शहराच्या रँकिंगचा आलेख चढता, उतरता राहत आहे. 2016 मध्ये शहराचा देशात 9 वा क्रमांक आला होता. तर, 2017 मध्ये शहर थेट 72 व्या क्रमांकावर फेकले होते. 2018 मध्ये थोडी सुधारणा होत 43 वा क्रमांक आला. पुन्हा 2019 मध्ये शहराची घसरण झाली आणि 52 क्रमांक आला. 2020 मध्ये सुधारणा होत 24 वा क्रमांक आला. 2021 मध्ये आणखी सुधारणा होत 19 वा क्रमांक आला. यंदा म्हणजेच 2022 मध्येही 19 वा च क्रमांक आला आहे. मागील सात वर्षात शहर एकदाही पहिल्या दहामध्ये आले नाही.

पहिल्या तीनमध्ये येण्यासाठी प्रयत्नशील – अतिरिक्त आयुक्त वाघ

याबाबत बोलताना अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ म्हणाले, ” ‘स्वच्छ सर्वेक्षण 2022’मध्ये शहराचा 19 वा क्रमांक आला आहे. स्वच्छतेमध्ये शहराची सुधारणा होत आहे. सिटीझन फीडबॅकमध्ये शहराला पुरस्कार मिळाला आहे. आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली “स्वच्छ सर्वेक्षण 2023″ साठी महापालिकेने आवश्‍यक तयारी सुरु केली आहे. शहर स्वच्छतेसाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम केले जात आहे. लोकप्रतिनिधी, जनतेच्या सहकार्याने यावर्षी पुन्हा चांगले काम करून पहिल्या तीनमध्ये येण्याचा प्रयत्न केला जाणार आहे”.

MCOCA : पुण्यातील विटकर टोळीवर मोक्का, चतुःश्रुंगी पोलिसांची कारवाई

“सर्वोत्तम नागरिक अभिप्राय यात 10 लाख ते 40 लाख लोकसंख्येच्या विभागात  देशातील  प्रथम क्रमांकाच्या पुरस्कारने पिंपरी-चिंचवडला गौरविण्यात आले. नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सर्वेक्षण चांगल्या दिशेने जात आहे”, असे आरोग्य विभागाचे उपायुक्त अजय चारठणकर म्हणाले.