Pune News : स्वच्छ संस्थेलाच यापुढेही काम – भाजप

एमपीसी न्यूज – शहरात वर्षानुवर्षे स्वच्छतेचे काम करणाऱ्या ‘स्वच्छ’ संस्थेलाच यापुढील काळातही काम देण्यात येणार असल्याची ग्वाही महापालिकेतील सत्ताधारी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी दिली.

‘स्वच्छ’ च्या कामाबद्दल ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव आणि पालिकेतील पदाधिकारी यांच्यामध्ये सोमवारी बैठक झाली,  यामध्ये ही ग्वाही देण्यात आली.

शहरात सुरू असलेले स्वच्छ संस्थेचे काम काढून घेण्याचा कोणताही विचार पालिकेचा नाही. उलट हे काम अधिक चांगल्या पद्धतीने होऊन नागरिकांच्या तक्रारी कमी करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे.  त्यादृष्टीने आवश्यक ती पावले उचलली जात असल्याचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी सांगितले. स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, डॉ. बाबा आढाव यांच्यासह स्वच्छ संस्थेचे सेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.

शहर स्वच्छ ठेवण्याचे काम मोठे कठीण असून ‘स्वच्छ’ शिवाय हे काम होणार नाही. आम्ही यापूर्वी तसेच पुढील काळातही ‘स्वच्छ’ बरोबर असून त्यांच्याबरोबरचा करार वाढवून त्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय लवकर घेण्यात येईल, असे आश्वासन यावेळी देण्यात आले. या बैठकीमध्ये महापौर मुरलीधर मोहोळ यांचा दूरध्वनीद्वारे सहभागी घेत स्वच्छतेचे काम करणाऱ्या कामगारांवर कोणताही अन्याय होणार नाही, असे स्पष्ट केले. पालिका प्रशासनाने तातडीने स्वच्छ संस्थेच्या कराराचा प्रस्ताव ठेवावा, अशा सूचना या बैठकीत प्रशासनाला देण्यात आल्या.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.