Talegaon Dabhade : स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा झाला. बुधवारी (दि. 12) राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले.

स्वामी विवेकानंद व आऊसाहेब यांचे प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन संस्थेचे सचिव मिलिंद शेलार, शालेय मुख्याध्यापिका शमशाद शेख यांच्या हस्ते करण्यात आले. सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनापासून 3 जानेवारी ते 12 जानेवारी राजमाता जिजाऊ जयंती पर्यंत ‘बालिका सप्ताह’ साजरा करण्यात आला.

बालिका सप्ताहाचे औचित्य साधून विद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. पोवाडा गायन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आदी ऑनलाईन स्पर्धा घेण्यात आल्या. इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले ,राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचे पोवाडे सादर केले.

कार्यक्रमाचे आयोजन नियोजन शालेय मुख्याध्यापिका शमशाद शेख, पर्यवेक्षिका रेणू शर्मा, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले. या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक श्रीडोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष  संतोष खांडगे, सचिव मिलिंद शेलार, शालेय समिती अध्यक्षा रजनीगंधा खांडगे  यांनी केले.

आनंदमय वातावरणात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद  यांचा जयघोष करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.