Pimpri News: आरपीआयच्या शहराध्यक्षपदी स्वप्नील कांबळे यांची निवड

एमपीसी न्यूज – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी स्वप्नील कांबळे यांची निवड झाली. त्यांनी कुणाल वाव्हळकर यांचा 79 मतांनी पराभव केला. दरम्यान, महापालिकेच्या आगामी निवडणुकीत आरपीआयचे जास्तीत-जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे कांबळे यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड शहर आरपीआयची आज (बुधवारी) पिंपरीत पत्रकार परिषद झाली. त्यावेळी शहराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणूक प्रक्रियेची माहिती देण्यात आली. पिंपरी-चिंचवडचे प्रभारी सूर्यकांत वाघमारे, महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस, माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे, माजी शहराध्यक्ष सुधाकर वारभूवन, रमेश चिमूरकर, युवक आघाडीचे प्रणव ओव्हाळ, गणेश गायकवाड आदी उपस्थित होते.

प्रभारी सूर्यकांत वाघमारे यांनी सांगितले, शहराध्यक्षपदासाठी लोकशाही पद्धतीने निवडणूक घेतली. मतपत्रिकेद्वारे मतदान झाले. स्वप्नील कांबळे आणि कुणाल वाव्हळकर दोघे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभे होते. शहरामध्ये पक्षाचे 2 हजार 155 क्रियाशील सदस्य झाले. पक्षाच्या घटनेनुसार क्रियाशील सदस्यच शहराध्यक्षाला मतदान करु शकतो. 50 साधे सभासद करणारा क्रियाशील सदस्य होतो. 2 हजार 155 क्रियाशील सदस्यांपैकी 1 हजार 454 जणांनी मतपत्रिकेद्वारे मतदान केले. त्यात 9 मते बाद झाली, त्यामुळे 1 हजार 445 पैकी स्वप्नील कांबळे यांना 762 तर कुणाल वाव्हळकर यांना 683 मते पडली. कांबळे 79 मतांनी शहराध्यक्षपदी विजयी झाले.

”पिंपरी-चिंचवड शहरातील प्रलंबित प्रश्न, झोपडपट्यांचा पुनर्वसनाचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करणार आहे. सर्वांशी चर्चा करुन लवकरच पक्षाची कार्यकारिणी जाहीर केली जाईल. महापालिका निवडणुकीत आरपीआयचे जास्तीत-जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे” नवनिर्वाचित शहराध्यक्ष कांबळे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.