Pune : स्वारगेट चौकातील सर्व पथारी सोमवारी हटविणार; महापालिकेची धडाकेबाज कारवाई 

अखेर स्वारगेट चौक होणार मोकळा 

एमपीसी न्यूज – स्वारगेट चौकातील वाहतूक कोंडीस कारणीभूत अनधिकृत तसेच महापालिकेने परवाना दिलेल्या अधिकृत स्टॉल व्यावसायिकांवरही पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई सुरू केली आहे. त्यांतर्गत स्वारगेट बसस्थानकाच्या बाजूला?असलेले सर्व खाद्य पदार्थाचे स्टॉल महापालिकेकडून कारवाई करून काढण्यात आले आहेत. 
तीन दिवसांपूर्वी या ठिकाणी एका सिलेंडरला आग लागल्याची घटना घडली होती. मात्र, वेळीच ती आटोक्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली होती. त्या विरोधात स्वारगेट पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल केला असून महापालिकेकडूनही गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच, असा प्रकार वर्दळीच्या ठिकाणी पुन्हा घडल्यास मोठी जिवीतहानी होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन अतिक्रमण विभागाने यापुढे याठिकाणी कोणालाही खाद्य पदार्थ विक्रीचा व्यवसाय करून न देण्याचा निर्णय घेतल्याचे माहिती अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी दिली आहे.

महापालिकेकडून या ठिकाणी काही पथारी व्यावसायिकांना परवाने दिले आहेत. मात्र, फेरीवाला धोरणानुसार रस्त्यावर खाद्यपदार्थ शिजवण्यास मनाई आहे. त्यानुसार, महापालिकेकडून रस्त्यावर खाद्य पदार्थ बनविताना आढळल्यास सिलिंडर जप्त केली जातात. महापालिकेचे ही कारवाई सुरू असतानाच स्वारगेट स्थानकाच्या बाहेर गॅस सिलेंडर पेटल्याची घटना घडली आहे. यामुळे पोलिसांना संबंधित विक्रेत्यावर गुन्हा दाखल केला असून पालिका ही गुन्हे दाखल करणार आहेत.
त्यामुळे, महापालिकेने या भागात असलेली वर्दळ आणि नागरिकांच्या सुरक्षा लक्षात घेऊन शनिवारी सकाळपासून या ठिकाणी असलेले खाद्य पदार्थ विक्रीचे स्टॉल काढले आहेत. या स्टॉलला महापालिकेची मान्यता असल्याने कारवाई करू नये अशी मागणी या स्टॉलधारकांनी केली होती. मात्र, महापालिकेने न्यायालयाचे आदेश तसेच पथारी धोरणाचे कारण सांगत या सर्व पथारी हटवण्याचा निर्णय घेतला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.