Pune : अपहरण झालेल्या ‘दुर्गा’ची अनाथाश्रमात परत सुखरूप पाठवणी

स्वारगेट पोलिसांच्या दक्षतेमुळे दुर्गा सहीसलामत

एमपीसी न्यूज – सोलापूर येथील मतिमंद अनाथ आश्रमातून अपहरण झालेल्या दुर्गाला स्वारगेट पोलिसांनी आश्रमात सुखरूप पाठविले. स्वारगेट एस. टी. स्टँड येथे पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांना दुर्गा ही एकटीच फिरताना सापडली होती. ही घटना गुरुवारी (2 ऑगस्ट) घडली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहमीप्रमाणे स्वारगेट एस.टी.स्टँड. येथे पेट्रोलिंग करताना पोलिसांना एक मुलगी एकटीच फिरत असताना दिसली. त्या मुलीला नाव व पत्ता विचारला असता ती काहीच उत्तर देत नव्हती. दरम्यान, ती मतिमंद असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यावेळी महिला पोलीस उप निरीक्षक क्षीरसागर यांनी त्या मुलीला एक वही व पेन दिला तेव्हा त्या मुलीने कागदावर तोडक्या मोडक्या अक्षरात दुर्गा नाव लिहले तसेच अनाथ आश्रम, सोलापूर असे लिहिले.

तात्काळ क्षीरसागर यांनी योग्य ती कारवाई करून तपासणी केली असता 25 जुलै 2018 ला दुर्गाचे मतिमंद अनाथ आश्रम सोलापूर येथून अपहरण झाल्याचे समोर आले. त्याप्रमाणे पोलीस उप निरीक्षक जाधव यांच्याशी संपर्क साधून दुर्गाबद्दल माहिती दिली. त्याप्रमाणे अनाथाश्रम संस्थेतील परिचारिका दुर्गाला घेण्यासाठी स्वारगेट पोलीस स्टेशन येथे आल्या व दुर्गाला
सुखरूप त्यांच्या ताब्यात देण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.