Swarsagar Festival News : हा सांगितिक कार्यक्रम सर्वांना समाधान, आनंद देणारा होऊ दे – डॉ. जयंत नारळीकर

एमपीसीन्यूज : ‘हा सांगितिक कार्यक्रम सर्वांना समाधान आणि आनंद देणारा होऊ दे ‘, अशा शुभेच्छा ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांनी स्वरसागर महोत्सवाचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करताना दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी गणितज्ञ डॉ. मंगला नारळीकर देखील विशेष उपस्थित होत्या.

पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात 22 व्या स्वरसागर महोत्सवाचे उद्घाटन डॉ. नारळीकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ज्येष्ठ शास्त्रीय गायक आणि स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांचे सुपुत्र श्रीनिवास जोशी आणि महापौर माई ढोरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

स्वरसागर महोत्सवाचे मुख्य संयोजक प्रवीण तुपे, नगरसेविका सुजाता पालांडे, पिंपरी चिंचवड सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिल गालिंदे, संयोजक संजय कांबळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी श्रीनिवास जोशी म्हणाले की, ‘माझ्या वडिलांचा खाक्या होता, जे बोलायचे ते गाण्यातूनच. त्यांच्या या उपदेशानुसार मी माझ्या गाण्यातूनच व्यक्त होणार आहे. काही वर्षांपूर्वी मी ‘स्वरसागर’मध्ये गायनसेवा केली आहे. लोकांची सांस्कृतिक गरज या महोत्सवातून पुरवली जाते याचा आनंदच आहे. अशाच प्रकारे हा महोत्सव उत्तरोत्तर वाढत जावो या सदिच्छा’.

महापौर ढोरे म्हणाल्या की, ‘यंदा सध्याच्या वातावरणाला अनुसरुन असाच आपण स्वरसागर महोत्सव आयोजित केला आहे. संगीत हे शांततेचे प्रतीक आहे. ते कोणालाही साध्य करता येत नाही. त्यासाठी तपश्चर्या लागते’.

प्रास्तविक मुख्य संयोजक प्रवीण तुपे यांनी केले. तसेच आभार सहसंयोजिका सुरेखा कुलकर्णी यांनी मानले. सूत्रसंचालन मिलींद कुलकर्णी यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.