Talavade News : वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिसाला शिवीगाळ व धक्काबुक्की

एमपीसी न्यूज – वाहतूक नियमन करत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला तिघांनी शिवीगाळ व धक्काबुक्की करत धमकी दिली. याप्रकरणी तीन जणांच्या विरोधात देहूरोड पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार गुरुवारी (दि. 9) दुपारी सव्वा एक वाजताच्या सुमारास तळवडे डिव्हिजन समोरील देहू – आळंदी रोडवर घडला.

सुरज रामदास जायकर, धीरज रामदास जायकर, प्रज्योत रामदास जायकर (तिघे र म्हेत्रे वस्ती, चिखली) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलीस नाईक गणेश वाडेकर यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोलीस नाईक गणेश वाडेकर हे तळवडे वाहतूक विभागात कार्यरत आहेत. ते गुरुवारी दुपारी सव्वाएक वाजताच्या सुमारास तळवडे डिव्हिजन समोरील देहू – आळंदी रस्त्यावर वाहतूक नियमनाचे काम करत होते. त्यावेळी आरोपी तिथे आले. त्यांनी पोलीस नाईक वाडेकर यांना शिवीगाळ व धक्काबुक्की करून त्यांच्या शर्टला लावलेली नेमप्लेट ओढून खाली पाडली. तसेच सोबत असलेल्या पोलीस अंमलदार व पोलीस अधिकारी यांच्याशी उद्धट वर्तन अरेरावीची भाषा वापरून धमकी दिली. याबाबत सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.