Chinchwad : गळ्यात कात्री खुपसून मनोविकृत मुलाने केला आईचा खून (व्हिडिओ)

मनोविकृत मुलगा फरार

एमपीसी न्यूज – आईच्या गळ्यात कात्री खुपसून तिचा निर्घृण खून करून एक मनोविकृत मुलगा फरार झाला. आज, रविवारी दुपारी चारच्या सुमारास चिंचवडमधील वाल्हेकरवाडी परिसरात ही घटना उघडकीस आली.

सुमन विजय सावंत (वय 75, रा.चिंचवड) असे खून झालेल्या आईचे नाव आहे. तर भूपेंद्र विजय सावंत (वय 35) असे आरोपी मुलाचे नाव आहे.

भूपेंद्र हा मनोरुग्ण असून आई व वडिलांसोबत वाल्हेकरवाडी येथे राहतो. पाच महिन्यांपूर्वी त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्याच्यावर येरवडा येथे मनोरुग्णालयात उपचार सुरु होते. त्यानंतर त्याला घरी आणले.  त्याच्या लग्नासाठी आणि अन्य कारणांमुळे सुमन आणि भुपेंद्र यांच्यामध्ये वारंवार वाद होत होते. त्याने यापूर्वी 28 एप्रिल 2018 रोजी आईच्या डोळ्यात चाकू मारून तिला जखमी केले होते.

सुमन या रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे घराबाहेर आल्या नाहीत तसेच त्यांच्या घरातून काहीच आवाज येत नव्हता. अखेर दुपारी शेजारच्यांनी दरवाजा उघडून पहिला. त्यावेळी सुमन या गळ्यात कात्री खुपसलेल्या अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. शेजारच्यांनी त्वरित चिंचवड पोलिसांना माहिती दिली. चिंचवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. दरम्यान आरोपी मुलगा फरार असून चिंचवड पोलीस शोध घेत आहेत.

https://www.youtube.com/watch?v=wyQk6XngN-U&feature=youtu.be

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.