T20 WC : T20 वर्ल्डकपसाठी गटांची घोषणा, भारत-पाकिस्तान असणार आमने सामने

एमपीसी न्यूज – आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आगामी T20 वर्ल्डकपसाठी गटांची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान हे एकाच गटात आहेत. दोघेही सुपर-12 च्या गट-2 मध्ये आहेत. 2019 एकदिवसीय विश्वचषक सामन्यात दोन्ही संघ आमने-सामने आले होते. त्यात भारतीय संघ विजयी झाला होता. त्यामुळे क्रिडा रसिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

कोरोनामुळे T20 वर्ल्डकप 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान भारताऐवजी यूएई आणि ओमान येथे खेळला जाईल. ओमानमधील बैठकीत आयसीसीच्या अधिकाऱ्यांसह बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांनीही भाग घेतला. T20 वर्ल्डकपचे सामन्याचे वेळापत्रक पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.

ओमान आणि यूएई येथे खेळल्या जाणार्‍या या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत आठ पात्र संघ सहभागी होणार आहेत. यातील चार संघ सुपर 12 फेरी गाठतील. प्राथमिक फेरीतील आठ संघांमध्ये बांगलादेश, श्रीलंका, आयर्लंड, नेदरलँड्स, स्कॉटलंड, नामीबिया, ओमान आणि पापुआ न्यू गिनी यांचा समावेश आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 14 नोव्हेंबरला होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.