T20 WC: इंग्लंड संघाने उडवला बांग्लादेशचा धुव्वा  

एमपीसी न्यूज: (विवेक कुलकर्णी)या स्पर्धेत आणि मागील काही मोसमात सातत्याने चांगला खेळ करणाऱ्या इंग्लंड संघाला विश्व करंडक स्पर्धेतही चांगलाच सूर गवसेलला आहे,त्याचीच कामगिरी आजही करत त्यांनी बांगलादेशवर आठ गडी आणि तब्बल पाचहुन अधिक षटके राखत मोठा विजय मिळवला.

आता खऱ्या अर्थाने विश्वकप स्पर्धा रंगात येत आहे,काही संघांनी आपल्यावर ठेवलेल्या विश्वासाला पात्र ठरत चांगली कामगिरी करून त्याला न्याय दिलाय तर माजी विजेत्या विंडीज ,भारत ,न्यूझीलंड  या मातब्बर  संघाने मात्र अद्यापही आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी केलेली नाही,विश्व करंडक विजेत्या इंग्लंडने मात्र आधी वेस्ट इंडीजला दणदणीत पराभूत केल्यानंतर आजही बांग्लादेश विरुद्धच्या सामन्यातही तोच धडाका कायम ठेवला.

आज ग्रुप ए च्या आणि सुपर 12 च्या विसाव्या सामन्याला अबुधाबी येथे सुरुवात झाली. बांग्लादेशचा कर्णधार महमुद्दलाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला खरा,पण इंग्लिश गोलंदाजांनी अतिशय भेदक गोलंदाजी करत तो साफ चुकीचा ठरवला.सामन्याच्या तिसऱ्याच षटकात मोईन अलीने लिटन दास आणि नईमला लागोपाठ बाद करून इंग्लंड संघाला जोरदार सुरुवात करून दिली,यावेळी बांग्लादेशची अवस्था दोन बाद चौदा अशी होती,यात केवळ 12 धावांची भर पडलेली असतानाच अष्टपैलू शकीब उल हसन सुद्धा वैयक्तिक चार धावा करून ख्रिस वोक्सची शिकार झाला,यानंतर कर्णधार महमूदल्ला व रहीमने जरा सावध पण डाव सावरणारी फलंदाजी सुरू केली,दोघांनी मिळून 37 धावा जोडल्या असतानाच रहीम 29 धावा करून लिव्हिंव्हस्टोनच्या गोलंदाजीवर बाद झाला,यानंतर बांग्लादेशचा डाव काही केल्या सावरला नाही तो नाहीच,ठराविक अंतराने विकेट पडतं गेल्याने आणि एकही मोठी भागीदारी न झाल्याने निर्धारीत 20 षटकात बांग्लादेश केवळ 124 धावाच करु शकला.इंग्लड संघांच्या सर्वच गोलंदाजानी बांग्लादेशच्या फलंदाजीला चांगली गोलंदाजी करून एकही संधी दिली नाही.मिल्सने तीन तर मोईन अली व लिव्हिंगस्टोनने दोन दोन बळी मिळवून बांग्लादेश संघाच्या डावाला खिंडार पाडले.

125 च्या सोप्या लक्षाचा यशस्वी पाठलाग करताना इंग्लिश डावाची सुरुवात जेसन रॉय आणि बटलरने धडाकेबाजरित्या सुरू केली खरी पण सामन्याच्या पाचव्या षटकात बटलर 18 चेंडूत 18 धावा काढून नौशामच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला, पण त्याने संघाला जवळपास 8 धावांच्या सरासरीने संघाला चांगली सुरुवात करून दिली होती.या चांगल्या सुरुवातीचा फायदा इतर इंग्लिश फलंदाजांनी घेतला नसता तरच नवल.जेसन रॉयने बघताबघता आपले अर्धशतक पूर्ण केले यात 5 चौकार आणि तीन षटकार सामील होते, अर्धशतक करून तो 61 धावावर बाद झाला,पण तोपर्यंत इंग्लिश संघ विजयाच्या अगदीच जवळ आला होता, उरलेल्या औपचारिकतेला डेव्हिड मलान आणि बेअरस्टोने सहज पूर्ण केले आणि एक मोठा विजय आपल्या झोळीत सहज टाकला.यामुळे आपले उपांत्य फेरीचे लक्ष ही आपल्यासाठी सोपे केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.