T20 WC Ind-Pak Match Updates :उत्कंठावर्धक सामन्यात भारतीय संघाने खराब सुरुवातीनंतर डाव सावरत ठेवले 152 धावांचे लक्ष्य!

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) – तमाम क्रिकेट विश्व ज्या सामन्याची चातकासारखी वाट पाहत होते, त्या भारत विरुद्ध पाकिस्तान या हाय व्होल्टेज सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानपुढे कर्णधार कोहलीच्या अर्धशतकी खेळीमुळे 152 धावांचे लक्ष ठेवले आहे.

पाकिस्तान कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, भारतीय संघाने  आज हार्दिक पंड्याला आणि वरुण चक्रवर्तीला अंतिम अकरा संघात स्थान दिले.भारतीय संघाने विश्वकरंडक स्पर्धेत पाकिस्तान संघावर नेहमीच वर्चस्व गाजवले आहे. आजही तीच कामगिरी करून दाखवण्याचे मोठे दडपण भारतीय संघावर सुद्धा होते आणि ही पराभवाची शृंखला तोडण्याचे दडपण पाकिस्तान संघावर सुद्धा.आणि हा रोमांच अनुभवायला तमाम क्रिकेटविश्व उत्सुक होते.

विराट कोहलीने या स्पर्धेनंतर 20/20 मधून कर्णधार म्हणून नसल्याचे याआधीच घोषित केले असल्याने त्याला विजयी समारोप देण्यासाठी भारतीय संघ उत्सुक आहे,या मोहिमेला आज खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.

रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी भारतीय फलंदाजीची सुरुवात केली खरी, पण सुपरहिरो रोहित शर्मा आणि राहुल दोघेही या महत्वपूर्ण सामन्यात स्वस्तात बाद झाल्याने भारतीय संघाला फार मोठा धक्का बसला. पाकिस्तानचा डावखुरा गोलंदाज शाहीन आफ्रिदीने जबरदस्त गोलंदाजी करतांना रोहितला शुन्यावर पायचीत  केले तर एका अप्रतिम इंस्वीगवर के एल राहुल ला वैयक्तिक तीन धावांवर त्रिफळाचित करून फार मोठा हादरा दिला.

यावेळी भारतीय संघाची अवस्था दोन षटकात दोन बाद सहा अशी बिकट झाली होती.आणि मैदानावर कर्णधार कोहलीला साथ देण्यासाठी आला युवा प्रतिभावंत सुर्यकुमार यादव. या दोघांनी झटपट पडलेल्या विकेट्सचे दडपण झुगारून खेळ सुरू ठेवला असे वाटत असतानाच सुर्यकुमार यादव 8 चेंडूत 11 धावा काढून हसन अलीच्या चेंडूवर यष्टीरक्षक रिझवानच्या हातुन झेलबाद झाला.यामुळे पहिल्या पॉवरप्लेच्या अखेरीस भारतीय संघाची अवस्था तीन गडी बाद 36 अशी कठीण झाली होती.आणि कर्णधार कोहलीला साथ देण्यासाठी ऋषभ पंत मैदानावर आला होता.

धावा काढणे कठीण झाले होते, पाकिस्तानी गोलंदाज या परिस्थितीचा फायदा  उठवत होते खरे, पण पंत आणि कोहलीने परिस्थितीचा अंदाज घेत मैदानावर टिकण्याला प्राधान्य दिले आणि खराब चेंडूचा योग्य तो समाचार ही घेतला.

त्यामुळेच खराब सुरुवातीनंतर पहिल्या दहा षटकानंतर भारतीय संघाची धावसंख्या होती तीन बाद 60. ऋषभ पंतने अडखळत सुरुवात केली खरी पण जम बसल्यावर मात्र त्याने सुंदर आणि आकर्षक फलंदाजी केली. त्याने केवळ एका हाताने दोन उत्तुंग षटकार मारताना आपल्या ताकतीचा आणि टाईमिंगचा सुंदर आविष्कार दाखवला, त्याच्या या फलंदाजीमुळे दोघांनी चौथ्या गड्यासाठी 53 धावांची भागीदारीही नोंदवली.

पंत आज चांगलाच भरात आलाय असे वाटत होते तोच त्याला त्याच्या अतिआक्रमकतेने पुन्हा एकदा दगा दिला आणि एक उत्तुंग षटकार मारण्याच्या नादात तो वैयक्तिक 39 धावांवर शादाब खानच्या गोलंदाजीवर त्याच्याच हातात झेल देवून बाद झाला. 30 चेंडूत आक्रमक 39 धावा जमवताना त्याने दोन चौकार आणि दोन उत्तुंग षटकार मारले, पण महत्वाचे म्हणजे त्याने भारतीय संघाला अडचणीतून बऱ्यापैकी बाहेर काढण्यात यश मिळवले.

जम बसल्यावरही आपली विकेट फेकणे या त्याच्या दोषात आज जरी सुधारणा झाली नसली तरी संघ व्यवस्थापन मात्र त्याला अशाच खेळासाठी संघात घेतेय. त्यामुळे त्याला मुक्तपणे फलंदाजी करता येते. त्याच्या जागी पंड्या ऐवजी जडेजाला पाठवले गेले पण जडेजा विशेष काही चमक दाखवू शकला नाही आणि धावगती वाढवण्याच्या नादात 13 धावांवर हसन अलीच्या गोलंदाजीवर बाद झाला.दुसऱ्या बाजूने कोहली मात्र शानदार खेळत होता.

त्याने जम बसल्यावर कसे खेळावे याचे उदाहरण पेश करताना आपले वैयक्तिक 29वे तर विश्व करंडक स्पर्धेतले दहावे अर्धशतक पूर्ण करताना आणखी एक विक्रम आपल्या शिरपेचात रोवला आहे. याच नादात तो वैयक्तिक  57 धावा काढून शाहीन आफ्रिदीची तिसरी शिकार झाला.त्याने केवळ 49 चेंडूत 57 धावा काढताना 5 चौकार आणि एक षटकार मारला.

दुर्दैवाने त्याला एक पंत सोडला तर दुसऱ्या बाजूने म्हणावी तशी साथ न मिळाल्याने भारतीय संघ  आपल्या निर्धारित 20 षटकात केवळ 151 धावाच जमवू शकला.अर्थात तीन बाद 32 नंतर 151 धावा नक्कीच कमी नाहीत. पाकिस्तान कडून शाहीन आफ्रिदीने चांगली गोलंदाजी करताना तीन तर हसन अलीने दोन गडी बाद करत त्याला उत्तम साथ दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.