Bhosari News : तडीपार आरोपीकडून पोलिसाला धक्काबुक्की

एमपीसी न्यूज – तडीपार केलेला आरोपी परवानगी शिवाय शहरात आला. त्यामुळे त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसाला तडीपार आरोपीने धक्काबुक्की केली. ही घटना गुरुवारी (दि. 25) सायंकाळी पाच वाजता पुणे-नाशिक महामार्गावर रोझरी स्कुलजवळ भोसरी येथे घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

रमजान मशाक कुरणे (वय 27, रा. मोरेवस्ती, चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलीस नाईक गणेश हिंगे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रमजान याला पोलिसांनी तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वीच तो शहरात आला. याची माहिती पोलिसांना मिळाल्याने भोसरी पोलिसांचे एक पथक त्याला ताब्यात घेण्यासाठी माहिती मिळालेल्या ठिकाणी गेले.

त्याला पकडण्यासाठी फिर्यादी पोलीस नाईक गणेश हिंगे देखील गेले होते. आरोपी रमजान याने पोलीस नाईक हिंगे यांना धक्काबुक्की करून जोरात धक्का मारून खाली पाडले. तसेच पोलीस करत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला.

याबाबत त्याला पोलिसांनी अटक केली. त्याने शासनाची परवानगी न घेता शहरात प्रवेश केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार त्याच्यावर भारतीय दंड विधान कलम 353, 332, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 142 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.