Ravet News : तडीपार आरोपी वर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की

एमपीसी न्यूज – तडीपार आरोपी पोलिसांची परवानगी न घेता शहरात आला. त्यामुळे त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना आरोपीने शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. याबाबत पोलिसांनी त्याच्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

निखिल साहेबराव साठे (वय 27, रा. दळवीनगर, निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस हवालदार जयंत राऊत यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एखाद्या आरोपीला जिल्ह्याच्या हद्दीतून तडीपार केल्यानंतर त्याला काही कारणास्तव जिल्ह्यात यायचे असल्यास शासनाची अथवा पोलीस उप आयुक्त यांची परवानगी घेणे आवश्यक असते. परवानगी न घेता जिल्ह्याच्या हद्दीत आल्यास त्याच्यावर पोलिसांकडून कारवाई केली जाते.

आरोपी निखिल साठे याला 31 डिसेंबर 2020 रोजी पिंपरी चिंचवड पोलिसांनी दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले होते. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो पुणे जिल्ह्यात आला. गुरुवारी दुपारी साडेचार वाजता तो रावेत-भक्ती शक्ती रोडवरील जलशुद्धीकरण केंद्राजवळ थांबला असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस अंमलदार जयंत राऊत आणि त्यांचे सहकारी आरोपी निखिल याला ताब्यात घेण्यासाठी गेले.

त्यावेळी निखिल याने फिर्यादी यांच्याशी झोंबाझोंबी करून शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. याबाबत त्याच्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.