Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडेचा तायडे बनला तोतया आयएएस अधिकारी; पुणे पोलिसांकडून अटक

एमपीसी न्यूज-आयएएस अधिकारी असल्याचे (Talegaon Dabhade) भासवून फसवणूक केल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तळेगाव दाभाडे येथून एका इसमाला अटक केली आहे. औंध परिसरातील एका सोसायटीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून हा व्यक्ती हजर होता. त्यानंतर पोलिसांना त्याच्यावर संशय आल्याने अधिक चौकशी केली असता हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. चतु:शृंगी पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ विनय देव उर्फ वासुदेव निवृत्ती तायडे (वय 54 वर्ष रा प्लाॅट नं.336, रानवारा राे हाऊस तळेगाव दाभाडे, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या  आयएएस अधिकाऱ्याचे नाव आहे. वासुदेव तायडे यांनी आपले खरे नाव लपवून डॉ विनय देव असे नाव लावले होते. आपण आयएएस अधिकारी असून पंतप्रधान कार्यालयात गोपनीय काम करत असल्याचे तो लोकांना सांगत होता.

प्रकरणी अधिक माहिती अशी की 29 मे रोजी औंध परिसरातील सिंध हाऊसिंग सोसायटी येथे औंध पुणे बाॅर्डर लेस वर्ल्ड फाऊन्डेशन या संस्थेच्या कार्यक्रमामधे जम्मु काश्मीर येथे मदतीसाठी पाठवीण्याकरीता ॲम्बुलन्स लोकार्पण साेहळा आयाेजित करण्यात आला हाेता. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणा म्हणून हजर असलेला डाॅ. विनय देव हा व्यक्ती स्वतः आयएएस अधिकारी असून पंतप्रधान कार्यालयात सेक्रेटरी पदावर गोपनीय काम करत असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र त्याने सांगिितलेल्या माहितीबाबत त्यांचेकडे संस्थेच्या पदाधिकारी यांनी अधिक विचारणा केली असता त्यांचे आय ए एस पदाबाबत त्यांना संशय वाटला.
त्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली होती. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने याबाबत विनय देव याचा शोध घेऊन तळेगाव दाभाडे येथील घरातून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्याने आपले खरे नाव वासुदेव तायडे असल्याचे सांगितले. तसेच आपण आयएएस अधिकारी असून पंतप्रधान कार्यालयात कार्यरत असल्याचे सांगून लोकांमध्ये वावरत असल्याची ही कबुली त्याने दिली. चतुशृंगी पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा (Talegaon Dabhade) दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.