Pimpri : ‘वेळप्रसंगी पक्षात नवीन उमेदवार घ्या, पण तीनही मतदार संघावर भगवा फडकलाच पाहिजे’

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निर्देश; गोविंद घोळवे यांची माहिती 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात शिवसेनेला चांगले वातावरण आहे. औद्योगिकनगरीत मराठवाड्यातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. त्यादृष्टीने पक्ष बांधणीचे काम हाती घ्या. तीनही विधानसभा मतदार संघावर भगवा फडकला पाहिजे. त्यासाठी वेळप्रंसगी पक्षात नवीन उमेदवार घ्या, पण भगवा फडकलाच पाहिजे, असे निर्देश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले असल्याची माहिती शिवसेना राज्यसंघटक व ज्येष्ठ पत्रकार गोविंद घोळवे यांनी दिली. 

शिवसेना राज्य संघटक व ज्येष्ठ पत्रकार गोविंद घोळवे, विधानपरिषदेचे आमदार तानाजी सांवत यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबईत ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. पिंपरी शहरातील पक्ष संघटनेवर सविस्तर चर्चा झाली. यावेळी सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. घोळवे यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील शिवसेनेच्या कार्याची माहिती दिली. उस्मानाबाद, सोलापूर, कोकण, बीड जिल्ह्यातील लाखो लोकांचे औद्योगिकनगरीत वास्तव आहे. भोसरी, चिंचवड मतदार संघात जास्त नागरिक राहत आहेत. हे मतदार शिवसेनेकडे वळतील याबाबतची सविस्तर माहिती ठाकरे यांना दिली.

त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, सत्ताधारी भाजपवर सर्वच वर्गातील नागरिक नाराज आहेत. व्यापारी, शेतकरी, नोकरदार, लघु उद्योजक सरकारवर नाराज आहेत. मराठवाड्यातील नागरिकांना सोबत घेऊन पिंपरी-चिंचवडमध्ये सक्षमपणे पक्षाची बांधणी करा. बुथ कमिट्या करा. तळागाळातील लोकांपर्यंत पोहचा. यावेळी काही करुन पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीनही विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचा आमदार निवडून आलाच पाहिजे. त्यादृष्टीने कामाला लागण्याचे आदेश ठाकरे यांनी दिले असल्याचे, घोळवे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.