Kiwale News : स्थगिती आदेशाचे उल्लंघन करून बांधकाम सुरु ठेवणाऱ्या ‘के- विले’वर कारवाई करा : श्रीजीत रमेशन

एमपीसीन्यूज : किवळे येथील के- विले गृहप्रकल्पावरील बांधकाम मजुरांना आवश्यक सुरक्षाविषयक साधने पुरविली नसल्याने या बांधकाम प्रकल्पाचे काम बंद करण्याचे आदेश कामगार आयुक्तांकडून देण्यात आले आहेत. मात्र, या आदेशाला केराची टोपली दाखवत हे काम सुरूच ठेवण्यात आल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ता श्रीजीत रमेशन यांनी केली आहे.

या संदर्भात रामेशन यांनी पुणे जिल्हा कामगार आयुक्तांकडे ईमेलद्वारे तक्रार केली आहे. किवळे येथे बीआरटी मार्गालगत के – विले नावाच्या गृहप्रकल्पाचे काम सुरु आहे. या बांधकाम प्रकल्पाच्या इमारतीवरून पडल्याने तपस रायपदा मंडल ( वय ३१ ,रा. के विले लेबर कॅम्प, आदर्श नगर किवळे, मूळ रा.गाजनो,पश्चिम पाडा थाना – हासकळी, राज्य प.बंगाल ) या बांधकाम मजुराचा मृत्यू झाला होता.

याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ता श्रीजीत रमेशन यांनी मुंबई येथील कामगार आयुक्त कार्यालयात तक्रार केली होती. त्याची दाखल घेत कामगार आयुक्तांनी शिवाजीनगर येथील कामगार उपायुक्त कार्यालयास चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सरकारी कामगार अधिकारी तथा इमारत व इतर बांधकाम निरीक्षक टी. एस. अत्तार यांनी बांधकाम प्रकल्पावर प्रत्यक्ष पाहणी केली.

त्यावेळी त्यांना बांधकाम प्रकल्पावर अनेक त्रुटी आढळून आल्याने इमारतींचे बांधकाम बंद करण्याचे आदेश कामगार आयुक्त आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रशासन विभागाला देण्यात आले होते

तसेच या प्रकरणी मुंबई येथील मुख्य कामगार आयुक्तांच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. काम बंद करण्याचे आदेश देऊनही संबंधित बांधकाम व्यवसायाकाने आदेशांचे उल्लंघन करीत बांधकाम सुरू ठेवले असल्याचा आरोप रामेशन यांनी केला आहे.

याबाबत रमेशन म्हणाले, किवळे परिसरात अनेक मोठमोठ्या गृहप्रकल्पाचे काम सुरु आहे. मात्र, तिथे बांधकाम मजुरांना सुरक्षा विषयक साधने आणि उपाययोजना केल्या जात नसल्याने यापूर्वी दोन मजुरांचा मृत्यू झाला. प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने बांधकाम व्यावसायिक मजुरांच्या जीवाशी खेळत आहे. मजुरांना सुरक्षा साधने पुरविला आहेत की नाहीत याची पाहणी प्रशासनाकडून होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर नियम पायदळी तुडवून सुरु असलेल्या बांधकाम साईट तातडीने बंद करून संबंधित बांधकाम व्यावसायिकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.