Pimpri : पाणीपुरवठ्यात राजकारण करणा-या अधिका-यांवर कारवाई करा : सचिन साठे

एमपीसी  न्यूज –   पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे महानगरपालिकेने निवेदन जाहीर केले आहे. पुण्याच्या पाणीप्रश्नात लक्ष देण्यास पालकमंत्र्यांना वेळ आहे मात्र पिंपरी चिंचवड शहराबाबत दुजाभाव का? वस्तुत: आवश्यक पाणीसाठा पवना धरणात असताना पाणीपुरवठ्याबाबत राजकारण केले जात आहे, अशा कामचुकार अधिका-यांवर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी कारवाई करावी अशी मागणी, पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केली आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मागील वर्षी सरासरी एवढा पाऊस झाला असताना जुलै अखेर पुरेल एवढा पाणीसाठा असल्याचे पाटबंधारे खात्याने सप्टेंबर महिन्यात जाहिर केले होते. तरीदेखील मनपा अधिका-यांनी उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन केले नाही. तसेच ठिकठिकाणी असणारी पाणीगळती रोखण्यास अधिका-यांना दरवर्षीप्रमाणे अपयश आले आहे.

शहरात असणारे अनधिकृत नळजोड अधिका-यांच्या मर्जीने दिवसेंदिवस वाढतच आहेत. 24 तास मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी व पाणी गळती रोखण्यासाठी स्काडा प्रणाली, तसेच पाण्याचा योग्य वापर व्हावा म्हणून शहरभर पाणी मीटर बसविण्यात आले. स्काडा प्रणाली व बसविण्यात आलेले पाणीमीटर सुरु आहेत की नाहीत याचा खुलासा संबंधित अधिका-यांनी करावा.

तसेच आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पाटबंधारे खात्याशी संबंधित अधिका-यांसमवेत पवना धरणावर प्रत्यक्ष भेट देऊन पाणीसाठ्याची पाहणी करावी, अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.