Pimpri : महिला पाहुण्यांचा ‘विशेष आकर्षण’ म्हणून उल्लेख करणा-या अधिका-यांवर कारवाई करा, वुमेन हेल्पलाईन फाऊंडेशनची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सांगवी येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘पवनाथडी’ जत्रेच्या उद्घाटन समारंभाच्या जाहिरातीमध्ये प्रमुख पाहुण्या म्हणून बोलाविलेल्या अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर यांचा उल्लेख ‘विशेष आकर्षण’ असा करून केवळ त्यांचाच नव्हे तर समस्त महिलावर्गाचा अपमान करण्यात आला आहे. हा उल्लेख आक्षेपार्ह तर आहेच शिवाय महिलांविषयी असलेल्या विकृत मानसिकतेचे दर्शन घडविणारा आहे. त्यामुळे महापालिकेच्या वतीने माफी मागण्यात यावी. याची चौकशी करून संबंधित दोषी अधिकारी, पदाधिकारी यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी वुमेन हेल्पलाईन फाऊंडेशनने केली आहे.

याबाबत महापौर उषा ढोरे यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात विमेन हेल्पलाईन फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा नीता परदेशी यांनी म्हटले आहे की,  अभिनेत्रीचा उल्लेख विशेष आकर्षण म्हणून करणे अतिशय चुकीचे आहे. महापालिकेसारख्या निमशासकीय संस्थेकडून अशा प्रकारची चूक होणे अक्षम्य आहे. त्यामुळे सर्वप्रथम महापालिकेच्या वतीने संबंधित अभिनेत्री व समस्त महिला वर्गाची बिनशर्त जाहीर माफी मागावी. तसेच या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून संबंधित दोषी अधिकारी व पदाधिकारी यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. सात दिवसांच्या आत कारवाई न झाल्यास विमेन हेल्पलाईनच्या वतीने महापालिका भवनासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

यापुढे महापालिकेकडून कोणत्याही प्रकारे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे महिलांचा अपमान होईल. असा कोणताही उल्लेख होणार नाही. याची दक्षता घेण्याबाबत आपण महिला महापौर या नात्याने प्रशासनाला लेखी आदेश द्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.