Pimpri News : पालखी सोहळ्यासाठी सोयी सुविधांमध्ये कमतरता राहणार नाही याची खबरदारी घ्या – आयुक्त पाटील

एमपीसी न्यूज – पालखी सोहळ्यासाठी महापालिकेच्या वतीने देण्यात येणा-या सोयी सुविधांमध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही याची दक्षता संबंधित विभाग प्रमुखांनी घ्यावी, असे निर्देश आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी दिले. सर्व विभागांनी आपसात समन्वय ठेवून आत्मियतेने पालखी सोहळ्याचे नियोजन करावे असेही ते म्हणाले.

जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 21 जून रोजी शहरात आगमन होत आहे तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे 22 जून रोजी आगमन होणार आहे.  या पार्श्वभूमीवर आयुक्त राजेश पाटील यांनी महापालिकेच्या सर्व संबंधित विभागांची बैठक बोलावली होती.  या बैठकीत विविध सूचना आयुक्त पाटील यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या, त्यावेळी ते बोलत होते.

महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामध्ये झालेल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, सहआयुक्त आशादेवी दुरगुडे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, सहशहर अभियंता मकरंद निकम, श्रीकांत सवणे, संजय खाबडे, संदेश चव्हाण, संजय कुलकर्णी, उपआयुक्त संदीप खोत, सचिन ढोले, विठ्ठल जोशी, मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, कार्यकारी अभियंता प्रविण घोडे, विजय काळे, बापू गायकवाड, आबासाहेब ढवळे, क्षेत्रीय अधिकारी शितल वाकडे, उमाकांत गायकवाड, राजेश आगळे, अण्णा बोदडे, विजयकुमार थोरात आदी उपस्थित होते.

आयुक्त राजेश पाटील म्हणाले, 21 जून रोजी जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे शहरात आगमन होत असून आकुर्डी येथे या सोहळ्याचा मुक्काम आहे.  मुक्कामाच्या ठिकाणी फिरती शौचालये, पिण्याचे पाणी अशा मुलभुत सुविधा उपलब्ध करुन देताना त्यात कोठेही उणीव राहता कामा नये.  ज्या शाळांमध्ये दिंड्यांचा मुक्काम आहे तेथे औषध फवारणी करावी.  तसेच स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करुन द्यावी.  वारक-यांना आरोग्य तसेच वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी स्वतंत्र पथक नेमावे.  कचरा संकलनासाठी जागोजागी डस्टबीन ठेवावे.

पालखी मार्गाची पाहणी करुन अडथळा आणि धोकेदायक असणा-या वृक्षांची छाटणी करावी, खड्डे बुजवावेत, उघड्या चेंबर्संना झाकण बसवावे आदी निर्देश आयुक्त पाटील यांनी यावेळी दिले.  पालखी सोबत महापालिका दरवर्षी अग्निशमन वाहन देत असते.  पालखी सोहळा प्रमुखांनी यावर्षी केलेल्या मागणीनुसार वैद्यकीय पथक आणि औषध व्यवस्थेसह पालखीसोबत महापालिकेच्या वतीने रुग्णवाहिका देण्यात येणार आहे असे आयुक्त पाटील यांनी यावेळी सांगितले.  प्लॅस्टीक मुक्तीचा संदेश देण्यासाठी दिंड्यांना प्रातिनिधिक स्वरुपात कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.