Khed News : कोरोना संबंधित सुरक्षा नियमावली धाब्यावर बसवून कामगाराच्या मृत्यूस जबाबदार कंपनीवर कायदेशीर कारवाई करा ; शिवगर्जना कामगार संघटनेची मागणी

Take legal action against the company responsible for the death of a worker by not following corona related safety regulations; Demand of Shivgarjana Kamgar Sangh.

एमपीसी न्यूज – कर्मचारी आजारी असताना देखील त्यांना जबरदस्ती कामावर बोलावणे तसेच एकदा कर्मचारी कोरोना बाधित सापडल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन न करता कामावर बोलावणे व संबंधित कर्मचारी बाधित सापडलेले ठिकाण सॅनिटायझ न करता तसेच इतर कर्मचाऱ्यांना त्याठिकाणी काम करण्यास भाग पडणे कंपनी संचालकाच्या अशा आडमुठे भूमिकेमुळे कंपनीतील अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. त्यात एका बाधित कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला त्यामुळे वर्षा फोर्जिंग व के व्ही ए पी या कंपनीवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी शिवगर्जना कामगार संघटननेने केली आहे.

शिवगर्जना कामगार संघटननेचे अध्यक्ष संतोष बोंद्रे यांनी आळंदी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे. तसेच, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह कामगारमंत्री, पुणे जिल्हधिकारी यांच्याकडे कारवाई करण्याबाबत निवदेन दिले आहे.

बोंद्रे यांनी या निवेदनात असे म्हंटले आहे की, कंपनी व्यवस्थापनातील विजय गुरव हे 25 जुलैपासून अजारी होते. तरीदेखील कंपनीने त्यांना कामावर हजर राहण्यास सांगितले 1 ऑगस्ट रोजी त्यांची तपासणी केली असता कोरोना चाचणी सकारात्मक आली.

तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या 8 कर्मचारी देखील सकारात्मक आले. विजय गुरव हे कोरोना बाधित सापडल्यानंतर ते काम करत असलेली जागा 48 तास सील करून ती जागा सॅनिटाइझ करावी अशी विनंती मालकास केली होती.

मात्र, कंपनी मालकाने असे न करता तसेच इतर कर्मचार्यांना काम करण्यास भाग पाडले. त्यामुळे कंपनीचे 8 कर्मचारी व 4 अधिकार्यांना लागण झाली.

यामध्ये कंपनी कर्मचारी संतोष घरत हे 8 ऑगस्टपासून अजारी होते, 12 ऑगस्ट रोजी कोरोनाची लागण झाल्याचे त्यांची केलेल्या चाचणीत स्पष्ट झाले. मात्र, मालकाने कामावरून काढून टाकण्याची धमकी दिल्यामुळे ते 11 ऑगस्टपर्य़ंत कामावर हजर राहत होते. त्यानुसार त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले मात्र, उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

एका कर्मचा-याचा मृत्यू झाला असून देखील त्यांच्या संपर्कात आलेल्या कर्मचा-यांना क्वांरंटाईन न करता त्यांना कामावर हजर राहण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात आहे. मात्र कोरोना भीतीपोटी हे कर्मचारी क्वारंटाईन झाले असून कामावर हजर राहण्यासाठी कचरत आहेत.

कंपनीत मास्क, हॅन्ड गोलव्हज पुरवले जात नाहीत तसेच, कंपनीत सोशल डिस्टंन्सिंगचे पालन केले जात नाही. त्यामुळे कामगारांच्या सुरक्षेला प्राधान्य न देता आडमुठी भूमिका घेणा-या कंपनी संचालकांवर कारवाई करावी अशी मागणी शिवगर्जना कामगार संघटनेने केली आहे.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबाला कंपनीने नुकसान भरपाई देण्याचे आदेश द्यावेत तसेच लॅाकडाऊन काळातील कर्मचा-यांचे 50 टक्के थकित वेतन कंपनीने द्यावे व कंपनी विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवगर्जना संघटनेने केली आहे.

दरम्यान, खेड तालुका तहसीलदार सुचित्रा आमले यांनी निवेदनाची दखल घेऊन कंपनी मालक यांना खडे बोल सुनावत कंपनी काही काळासाठी बंद केली होती. त्यांनतर कंपनीने सर्व कर्मचाऱ्यांची स्वॅब टेस्ट करण्याची तयारी दर्शवली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.