Pimpri : शहरातील विहिरी आणि कूपनलिका ताब्यात घ्या – लक्ष्मण जगताप

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व विहिरी व कूपनलिका ताब्यात घेऊन त्याचे पाणी नागरिकांना उपलब्ध करून द्यावे. यामुळे पाणीटंचाईवर काही प्रमाणात मात करता येणे शक्य होईल. त्याकरिता या विहिरी व कूपनलिका जिल्हाधिकारी यांच्यामार्फत अधिग्रहण करण्याची कार्यवाही करावी, अशी सूचना भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना केली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये निर्माण झालेल्या पाणीटंचाईमुळे गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांची काही टँकर माफियांकडून अक्षरशः लूट सुरू आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागात असणाऱ्या विहिरी व कूपनलिकांच्या माध्यमातून मिळणारे पाणी नागरिकांना अवास्तव दराने विकून हे टँकर माफिया आपले उखळ पांढरे करत आहेत.

या टँकर माफियांनी मांडलेल्या उच्छादांमुळे सर्वसामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. शहरातील सर्व विहिरी व कूपनलिका ताब्यात घेऊन त्याचे पाणी नागरिकांना उपलब्ध करून दिल्यास पाणीटंचाईवर काही प्रमाणात मात करता येणे शक्य होईल. त्यामुळे या विहिरी व कूपनलिका जिल्हाधिकारी यांच्यामार्फत अधिग्रहण करण्याची कार्यवाही करावी.

शहराच्या वेगवेगळ्या भागात विहिरी व कूपनलिका खोदण्यात आलेल्या आहेत. त्यांची संख्या मोठी आहे. काही विहिरी व कूपनिलिका या सरकारी खर्चाने, तर काही नागरिकांनी स्वखर्चाने खोदलेल्या आहेत. या विहिरी व कूपनलिकांचे पाणी नागरिकांना उपलब्ध करून देता येणे शक्य आहे. त्यातून पाणीटंचाईवर काही प्रमाणात मात करता येणार आहे.

प्रत्यक्षात या विहिरी व कूपनलिकांचे पाणी विकणारे टँकर माफिया शहरात उदयास आले आहेत. शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांना अवास्तव दराने पाणी विकून टँकर माफिया आपले उखळ पांढरे करत आहेत. सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांची पाण्याच्या नावाखाली एक प्रकारे लुटच सुरू आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. शहराची सध्याची पाणीटंचाई लक्षात घेता महापालिका प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेणे गरजेचे आहे, असे जगताप यांनी निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.