Pimpri : 70 टक्क्यांपुढील उर्वरित 30 टक्के रस्ते प्राधान्याने ताब्यात घ्या, जागेवर ‘सीमांकन’ करा – महापौर जाधव 

अकराशे आरक्षणांपैकी केवळ 390 आरक्षणे पालिकेच्या ताब्यात

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील 70 टक्क्यांपुढील रस्ते ताब्यात घेण्यास प्राधान्य देण्यात यावे. स्थापत्य आणि बांधकाम विभागाने एकत्रित जाऊन ‘सिमांकन’ करावे. बाधितांशी वाटाघाटी करुन त्यांना योग्य मोबदला देण्यात यावा, अशा सूचना महापौर राहुल जाधव यांनी नगररचना व विकास विभागाच्या अधिका-यांना दिल्या आहेत. विकासाला प्राधान्य देण्यात येणार असून आरक्षणे ताब्यात आल्याशिवाय शहर स्मार्ट सिटी होणार नाही, असेही ते म्हणाले. 

महापौर राहुल जाधव यांनी आज (बुधवारी) नगररचना व विकास विभागाची आढावा बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांना माहिती देताना महापौर राहुल जाधव म्हणाले, पिंपरी-चिंचवड महापालिकेने विकासकामांसाठी शहरातील विविध ठिकाणी टाकलेल्या 1109 आरक्षणापैंकी केवळ 390 आरक्षणे 100 टक्के पालिकेच्या ताब्यात आहेत. उर्वरित आरक्षणाचा ताबा घेतला नसल्यामुळे शहर विकासाला खीळ बसत आहे. त्यामुळे रस्त्याच्या 70 टक्क्यांपुढील ताब्यातील आरक्षणाचे ‘सिमांकन’ करण्यात यावे. उर्वरित 30 टक्के जागा ताब्यात घेण्यास प्राधान्य देण्यात यावे. बाधितांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी खासगी वाटाघाटी करावी. एफएसआय अथवा टीडीआर देण्यात यावा. यापैकी एकही पर्याय मान्य नसेत तर कारवाई करुन जागा ताब्यात घेण्यात यावी.

30 टक्के जागा ताब्यात नसल्यामुळे रस्ते विकसित करण्यास मोठी अडचण येत आहे. विकासाला प्राधान्य देणे आवश्यक आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसात  70 टक्क्यांपुढील ताब्यातील आरक्षणाचे ‘सिमांकन’ करण्यात यावे. तसेच सर्व आरक्षणे ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करावेत. तीन टप्प्यात आरक्षणे ताब्यात घ्यावीत. 0 ते 40 टक्के, 40 ते 70 टक्के आणि 70 ते 100 टक्क्यांपुढील असे तीन टप्यात आरक्षणे ताब्यात घेण्याची कारवाई करावी, असे निर्देश महापौर जाधव यांनी अधिका-यांना दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.