Pimpri News: सफाई कामगार महिलांना कायमस्वरूपी महापालिका सेवेत घ्या – बाबा कांबळे

एमपीसी न्यूज – एका ठेकेदार संस्थेवर कारवाई करून तीच कामे कंत्राटी पद्धतीने दुसऱ्या ठेकेदारास देण्यात आले आहेत. ज्या ठेकेदारांना विभागून हे काम देण्यात आले आहेत. त्यापैकी एका ठेकेदार  संस्थेवरती महिलांना  कमी पगार देणे, त्यांची बँक पासबुक ATM स्वतःकडे ठेवणे असे  आरोप झालेले आहेत. अशा ठेकेदारास ही कामे देण्यात आलेले आहेत.

यामुळे महिलांचे शोषण सुरूच असून फक्त ठेकेदार बदलला अशी भावना निर्माण झाली आहे. यामुळे ठेकेदार पद्धती रद्द करून  महापालिकेमध्ये गेल्या वीस वर्षापासून रस्ते साफसफाई झडलोट करणाऱ्या सोळाशे पेक्षा अधिक सफाई कामगार कष्टकरी महिलांना कायम सेवेत घ्यावे,अशी मागणी कष्टकरी कामगार पंचायतीच्या वतीने पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी केली आहे.

याबाबत महापालिका  आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. कांबळे म्हणाले, आयुक्तांनी  गोरगरीब कष्टकरी महिलांची पूर्णपणे बाजू घेतली नाही. एका ठेकेदाराकडून कामे काढून ज्या ठेकेदारावर सेम त्याच पद्धतीचे  आरोप झालेले आहेत.  तश्या तक्रार देखील दाखल आहेत अशा ठेकेदारांना ही कामे देऊन, न्याय सुसंगत अशी भूमिका घेतलेली नाही.

यामुळे आयुक्तांचा नेमका उद्देश काय हे स्पष्ट होत नसून आयुक्तांची भूमिका संशयास्पद आहे असे लक्षात येते.  शहरामध्ये सोळाशे पेक्षा अधिक महिला रस्ते साफसफाई झाडलोट पद्धतीने कंत्राटी पद्धतीने कामे करत आहेत. गेल्या वीस वर्षापासून या महिला याच ठिकाणी कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत. एखाद्या ठिकाणी कायमस्वरूपी काम करत  असतील. तर, त्या ठिकाणी कंत्राटी पद्धत रद्द करून त्या ठिकाणी कायमस्वरूपी कामगार नेमण्यात यावेत अशा प्रकारचे शासनाचे आदेश आहेत व कामगार कायदा स्पष्ट तरदूत  आहे.

यामुळे कामगार कायद्याच्या नियमाप्रमाणे या सर्व सोळाशे महिलांना कायमस्वरूपी कामावर घेणे आवश्यक असताना  आयुक्त राजेश पाटील यांनी रस्ते साफसफाई ची नविन  निविदा प्रकाशित केली आहे. या निविदामध्ये फक्त रस्ते साफसफाई करणे आणि त्या ठिकाणी लागणारे मनुष्यबळ पुरवणे असे निविदेमध्ये म्हटले आहे.

परंतु प्रत्यक्ष मात्र या ठिकाणी किती कामगार काम करणार आहेत त्यामध्ये आता जे सोळाशे महिला आहेत त्यांना कामे मिळणार आहेत का ?  किंवा त्यापैकी काही महिलांना वगळण्यात येणार आहे ही बाब स्पष्ट होत नाही. यामुळे पुढील काळामध्ये महिलांचा रोजगार जाण्याची शक्यता आहे. यामुळे रस्ते साफ सफाई कामगार महिलांमध्ये चिंतेचे वातावरण असून कोविड  काळामध्ये आम्ही सर्व बंद असताना  जिव धोक्यात घालून सेवा दिली आणि आता मात्र आमचे काम जाण्याची भीती त्यांच्या मनात निर्माण झाली आहे.

याबाबत प्रशासनाच्या वतीने स्पष्टीकरण देण्यात यावे आणि महिलांचे काम जाणार नाही याबद्दलचे  आश्वासन प्रशासनाने द्यावे. तसेच ही निविदा रद्द करून त्या ठिकाणी कायमस्वरूपी महिलांना कामावर घ्यावे या मागणीचे निवेदन  कष्टकरी कामगार पंचायत वतीने देण्यात आले आहे. निवेदनाची दखल न घेतल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी बाबा कांबळे यांनी दिला.

यावेळी कष्टकरी कामगार पंचायत कार्याध्यक्ष बळीराम काकडे ,कोषाध्यक्ष प्रल्‍हादभाऊ कांबळे, कष्टकरी जनता महिला आघाडी अध्यक्षा अनिताताई सावळे, उपाध्यक्षा मधुराताई डांगे, आदी यावेळी उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.