Talavade : परिसरातील तीन रस्त्यांवर अवजड वाहनांना सकाळ-संध्याकाळ प्रवेश बंदी

एमपीसी न्यूज – तळवडे वाहतूक विभागात येणाऱ्या तळवडे आयटी पार्क चौक, तळवडे गावठाण चौक, त्रिवेणीनगर चौक या रस्त्यांवर सकाळी आठ ते अकरा आणि सायंकाळी सहा ते रात्री नऊ या वेळेत दोन टनापेक्षा जास्त अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. हा बदल प्रायोगिक तत्वावर करण्यात आला आहे.पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी याबाबतचा आदेश दिला आहे. 7 जानेवारी ते 21 जानेवारी या कालावधीत हा बदल असणार आहे.

दरम्यान, या बदलाबाबत नागरिकांच्या काही हरकती आणि सूचना असतील तर त्या पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेत जमा करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. नागरिकांच्या हरकती आणि सूचनांचा विचार करून पुढील आदेश काढण्यात येणार आहे.

तळवडे आयटी पार्कमुळे तसेच या भागात असणारी औद्योगिक वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळी परिसरातील तळवडे आयटी पार्क चौक, तळवडे गावठाण चौक, त्रिवेणीनगर चौक या रस्त्यांवर मोठी वाहतूककोंडी होते.

औद्योगिक वाहतूक करणा-या वाहनांमुळे वाहतूककोंडी जास्त होत असल्याने तसेच सकाळी आणि संध्याकाळी आयटी पार्क आणि इतर ठिकाणी कामावरून येणा-या जाणा-या नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.