Talawade News : आल्हाददायक ! निघोजे परिसरात मोरांच्या संख्येत वाढ

एमपीसी न्यूज – निघोजे गावच्या हद्दीत मागील पाच वर्षांपासून मोरांचा वावर होताना दिसत आहे. अलीकडे या भागात मोरांच्या संख्येत वाढ वाढ झाल्याचे निरिक्षण प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समिती पर्यावरण विभागाच्या पक्षी प्रेमींनी नोंदवले आहे. सप्टेंबर महिन्यात 11 मोर व लांडोर यांचे शेतात दर्शन घडल्याचे पक्षीप्रमींनी म्हटले आहे.

तळवडे पासून तीन किलो मीटरच्या अंतरावर झाडी झुडपे व मोठ्या प्रमाणात वृक्ष संपदा आहे. ऑगस्ट 2017 मध्ये चार मोर व लांडोर यांचे दर्शन झाले. तर, या महिन्यात 11 मोर व लांडोर यांचे शेतात दर्शन घडले. या पक्षांच्या संख्येत गेल्या दोन वर्षात वाढ नोंदवली गेली असून पिंपरी चिंचवड शहरासाठी ही आनंदाची बाब आहे. हा भाग विविध रंगी पोपट, धनेश, कोकिळा व मोर यांच्यासाठी वरदान ठरत आहे. असे पक्षी प्रेमींनी म्हटले आहे.

प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष व पक्षीप्रेमी विजय पाटील म्हणाले, ‘2017 पासून पक्षीप्रेमी व पर्यावरण अभ्यासक संतोष चव्हाण, बाबासाहेब घाळी, विजय मुनोत व मी या परिसरात पक्षी निरीक्षण करत आहे . मोर हा सामाजिक व्यवस्था जपणारा पक्षी आहे. पाली, बेडूक, कीटक, धान्य असे बहुभक्षक अन्न खात असल्याने शेत परिसरात त्याचा वावर असतो. मोर तसेच लांडोर असे नर व मादी पक्षी आठ ते दहा जणांच्या समूहामध्ये ते राहताना निघोजे परिसरात आढळून येत आहेत. सकाळी व दुपारच्या शांत वेळेत पिसारा फुलवून पक्षी प्रेमींना विलोभनीय दर्शन देत आहेत.’

पाटील पुढे म्हणाले, ‘चाकण ‘एमआयडीसी’च्या स्थापनेनंतर खेड तालुक्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. पिंपरी चिंचवड व चाकण परिसरातील निघोजे, म्हाळुंगे, खालुंब्रे, आंबेठाण ही गावे आता तासाभराच्या वाहतुक परिघामध्ये आलेली आहेत. सदरची गावे कंपन्यांमुळे वेगाने कात टाकत आहेत. परंतु उपजतच निसर्ग सौंदर्य लाभलेल्या या गावांमध्ये आता मनुष्य हस्तक्षेपामुळे पक्षांच्या अधिवासाला धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एमआयडीसी प्रशासनाने पर्यावरण अभ्यासकांना बरोबर घेऊन काही भागाचे सर्वेक्षण करून पक्षांचा अधिवास असणाऱ्या महत्वाच्या भागास संरक्षित करणे आवश्यक आहे.’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.