Talawade : तळवडे येथील आगीत दहा जखमी, सहा जणांचा मृत्यू; जखमींवर ससून रुग्णालयात उपचार सुरु

एमपीसी न्यूज – ज्योतिबा नगर, तळवडे येथे प्लॉट नंबर 252 मध्ये केकवर लावल्या जाणाऱ्या स्पार्कल्स बनवणाऱ्या कारखान्यात शुक्रवारी (दि. 8) दुपारी पावणे तीन वाजताच्या सुमारास स्फोट झाला. या स्फोटात सहा महिला कामगारांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. तर दहाजण जखमी झाले. जखमींवर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यातील काहींची प्रकृती अतिशय नाजूक आहे.

शिल्पा राठोड (वय 31), प्रतिक्षा तोरणे (वय 16), अपेक्षा तोरणे (वय 26), कविता राठोड (वय 45), रेणुका ताथोड, (वय 20), शरद सुतार (वय 45), कोमल चौरे (वय 25), राधा उर्फ सुमन यादव (वय 40), उषा पाडवे (वय 40) आणि प्रियंका यादव (वय 32) अशी जखमींची नावे आहेत. मृत्यू झालेल्या महिला कामगारांची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे.

तळवडे येथे राणा इंजिनिअरिंग या कंपनीच्या आवारात असलेल्या एका गोडाऊनमध्ये केकवर लावल्या जाणाऱ्या स्पार्कल्स बनवल्या जात होत्या. या स्पार्कल्समध्ये काही प्रमाणात दारू वापरली जाते. नेहमीप्रमाणे कारखान्यात काम करणाऱ्या महिला शुक्रवारी सकाळी कामावर आल्या.

कारखान्यात काम करत असताना अचानक स्फोट झाला. या स्फोटाच्या हाद-याने कारखान्याचे शटर बंद झाले. दरम्यान, कारखान्याचे शटर बंद करूनच काम केले जात असल्याचे उघड झाले आहे.

स्फोटाच्या आवाजाने शटर झाकले गेले. स्फोटकाचा मोठ्या प्रमाणात उग्र धूर झाला. आग आणि धूर यामध्ये कोंडमारा होऊन होरपळून सहा महिला कामगारांचा जागीच मृत्यू झाला. तर एक पुरुष आणि नऊ महिला गंभीर जखमी झाल्या.

घटना घडल्यानंतर काही वेळाने स्थानिक नागरिकांनी रुग्णवाहिकेची वाट न पाहता महिलांना एका टेम्पोत घालून तात्काळ पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात पाठवले.

दुपारी तीन वाजता अग्निशमन विभागाला घटनेची माहिती मिळाली. त्यानुसार अग्निशमन विभागाचे सहा बंब घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी कारखान्याच्या पाठीमागील बाजूची भिंत फोडून आतमध्ये पाणी मारून आगीवर नियंत्रण मिळवले.

स्फोटाच्या धक्क्याने कारखान्याच्या भिंतीला तडे गेले आहेत. त्यावरून या स्फोटाची आणि एकूणच घटनेची भीषणता व्यक्त केली जात आहे.

त्यानंतर महापालिका आयुक्त शेख सिंह, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, प्रशासन आणि पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अधिकाऱ्यांनी घटनेची माहिती घेऊन जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना दिल्या.

पोलिसांकडून ग्रीन कॉरिडॉर

आगीच्या दुर्घटनेतील जखमींवर वायसीएम रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी आठ रुग्णांना पुणे येथील ससून रुग्णालयात हलविण्यात आले. जखमींना वायसीएम मधून ससूनमध्ये नेत असताना पोलिसांनी ग्रीन कॉरिडॉर केला. पोलीस बंदोबस्तात रुग्णवाहिका जलद गतीने ससून रुग्णालयात दाखल झाल्या.

अग्निशमन दलाचे बंब वाहतूक कोंडीत अडकले

आगीची घटना घडल्यानंतर ज्योतिबा नगर येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. वाहतुकीचा अडथळा येऊ नये यासाठी वाहतूक शाखेचे पोलीस आयुक्त बापू बांगर स्वतः घटनास्थळी आले.

त्यांनी वाहतूक नियमन करण्यासाठी मदत करत वाहतूक सुरळीत केली. परंतु एरवी देखील या रस्त्यावर वाहतूक कोंडी नित्याची आहे. या घटनेमुळे त्यात आणखी भर पडली. याचा फटका अग्निशमन दलाचे बंब आणि रुग्णवाहिका यांना बसला. घटनास्थळावरून निघालेल्या रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकल्या. वाहतूक पोलिसांनी रुग्णवाहिकांना रस्ता करून देण्यात आला.

मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता

जखमी रुग्णांमध्ये एका 16 वर्षीय मुलीचाही समावेश आहे. ही मुलगी 90 ते 95 टक्के भाजली आहे. चार महिला 70 टक्क्यांहून अधिक भाजल्या आहेत. तर तीन महिला 40 ते 45 टक्के भाजल्या आहेत. यातील काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर तातडीचे उपचार सुरु आहेत. मात्र, दुर्दैवाने या घटनेत मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ससून रुग्णालयात हिंजवडी पोलिसांचे पथक

जखमींना वायसीएम रुग्णालयातून ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथल्या सर्व प्रक्रियेत मदत करण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पोलिसांचे एक पथक ससून रुग्णालयात तैनात केले आहे.

त्यामध्ये हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आणि 10 कर्मचारी यांचा समावेश आहे.

Pune : तळवडे एमआयडीसीत जखमी झालेल्या रुग्णांची जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडून विचारपूस

पोलीस छावणीचे स्वरुप

तळवडे येथे घडलेल्या घटनेची दाहकता प्रचंड होती. स्फोट होऊन सहा कामगारांचा मृत्यू झाल्याने इथे नागरिकांनी एकच गर्दी केली. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पिंपरी-चिंचवड पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी तैनात करण्यात आला.

सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच पोलीस कर्मचारी, गुन्हे शाखेचे पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. तसेच वायसीएम रुग्णालयात देखील पोलिसांचा मोठा बंदोबस्त पहायला मिळाला.

देहूरोड पोलिसांचे दुर्लक्ष

स्फोटाची घटना घडलेला स्पार्कल्स बनवणारा कारखाना रेड झोन परिसरात आहे. त्यात तिथे ज्वलनशील उत्पादने तयार केली जात होती. तिथे कोणत्याही प्रकारची सुरक्षेची काळजी घेतली गेली नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले.

हा परिसर देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. आपल्या हद्दीत धोकादायकपणे ज्वलनशील उत्पादने तयार होत असल्याची कल्पना देहूरोड पोलिसांना नव्हती का?असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. तसेच कारखाना चालवताना सुरक्षेची कोणती आणि कितपत खबरदारी घेतली गेली याचीही उलटसुलट चर्चा सुरु आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.