Talegaon Dabhade : मावळातील युवा उद्योजकाची सामाजिक बांधिलकी; ‘व्हेंटिलेटर’साठी मोजले १२ लाख रुपये

एमपीसी न्यूज : देशवासीयांना कोरोना संसर्गापासून रोखण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारकडून विशेष प्रयत्न चालू आहेत. सरकारी दवाखान्यात व्हेंटिलेटरची कमतरता असल्याने ती दूर करण्यासाठी मदत म्हणून आंबी (ता.मावळ) गावचे रहिवासी तथा युवा उद्योजक रणजित काकडे यांनी गुरुवारी (ता.15) सुमारे 12 लाख रुपये भरून व्हेंटिलेटरची पर्चेस ऑर्डर दिली.  महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने केलेल्या आवाहनानंतर काकडे यांनी त्यांच्या आरएमके इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लिमिटेड कंपनीतर्फे रेस्पिरॉनिक्स व्ही-60 या उच्च दर्जाच्या व्हेंटिलेटरची ऑर्डर दिली आहे. दरम्यान, मॅक्रो पॉवर कंपनीने सदर व्हेंटिलेटर जलद वेळेत उपलब्ध करून देण्याबाबत कळविले आहे. 

कोरोना सामूहिक संसर्ग रोखण्यासाठी देशात लाॅकडाऊन सुरू आहे. अनपेक्षितपणे उदभवलेल्या या संकटामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. अवघ्या देशाला या संसर्गाचा फटका बसत आहे. व्हेंटिलेटरच्या कमतरतेमुळे कोविड-19 बाधित किंवा संशयित रुग्णांना उपचारासाठी मर्यादा येत असल्याचा कारणाने एमआयडीसीने उद्योजकांना मदतीचे आवाहन केले होते.

त्यानुसार 11 लाख 76 हजार रुपये खर्च करून रणजित काकडे यांनी ही मदत देऊ केली आहे. त्याबाबत बोलताना ते म्हणाले, की ग्रामीण भागातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे; मात्र ज्या ठिकाणी व्हेंटिलेटरची गरज असेल तेथे ते पोचविण्यात येईल. रेस्पिरॉनिक्स व्ही-60 हे उपकरण आयसीयू ग्रेडचे एनआयव्ही परफॉर्मन्सचे असून ते लहान बाळ असो किंवा वयोवृद्ध पेशंट सर्वांसाठी वापरता येणारे आहे. एमआयडीसीचे मुख्य अभियंता सुधाकर वाघ, कार्यकारी अभियंता संजय कोतवाड व वरिष्ठ भूमापक महेश डोंगरे यांनी याकामी मार्गदर्शन केले असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासन उपाययोजना करीत आहे. त्यासाठी अनेकजण योगदान देत आहेत. मी देखील खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला आहे. सामाजिक बांधिलकीने  समाजाचे देणे लागत असल्याने प्रत्येकाने आपल्या परीने मदतीचा हात देऊन उपकृत व्हावे, असे आवाहन उद्योजक रणजित काकडे यांनी केले आहे.

 सव्वालाख रुपये जीएसटी 

व्हेंटिलेटरची मूळ किंमत 10 लाख 50 हजार आहे. त्यावर 1 लाख 26 हजार रुपये जीएसटी लावण्यात आला आहे. केंद्र सरकारने वैदयकीय उपकरणावरील जीएसटीसहित अन्य कर माफ केले, तर दानशूर व्यक्ती अधिक संख्येने मदतीसाठी पुढे येतील. 

 

कोविड-19 च्या संसर्गामुळे व्यक्तीला न्यूमोनिया होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर असते. यामध्ये फुप्फुसे निकामी होण्याची शक्यता जास्त असते. ज्येष्ठ किंवा दुर्धर आजार असलेल्या व्यक्तीला अशावेळी कृत्रिम श्वसनाची गरज  असते. व्हेंटिलेटरच्या माध्यमातून ही गरज पूर्ण करण्यात येते. इतर उद्योजकांनी देखील शक्य असेल तेवढी मदत देण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे – रामदास काकडे , प्रसिद्ध उद्योजक, संस्थापक-आरएमके इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी. 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.