Talegaon: नाच रे मोरा कार्यक्रमात रसिक झाले ‘गदिमा’मय

नाट्यसंस्कार कला अकादमी आणि कलापिनी संस्था यांच्या संयुक्त उपक्रमामध्ये श्रेष्ठ कवी ग दि माडगूळकर यांच्या जीवनावर आधारित ‘नाच रे मोरा’ हा कार्यक्रम सादर करण्यात आला. यामध्ये ग. दि. माडगूळकर यांनी लिहिलेल्या विविध कविता, बालगीते, भक्तिगीते यांवर अनेक प्रसंग, नृत्ये, गाणी सादर करण्यात आली.

ग. दि. माडगूळकर यांच्या जन्मापासून ते प्रगल्भ कवी होईपर्यंतचा जीवनप्रवास यात दाखविण्यात आला. ते लहान असतानाचे अत्यंत हलाखीचे दिवस नंतर शिक्षण घेत अतिशय बुद्धिमान आणि कलासक्त असे व्यक्तिमत्त्व कसे फुलत गेले, भक्तिगीते, भावगीते, बालगीते ते अजरामर असे ‘गीतरामायण’ त्यांच्या हातून कसे लिहिले गेले याचा थक्क करणारा प्रवास या कार्यक्रमातून उलगडत गेला.

लहान मुलांना आपलीशी वाटणारी ‘झुक झुक अगीन गाडी, नाच रे मोरा, गोरी गोरी पान ही गाणी तसेच बंभेरी हे ठेका धरायला लावणारे बालगीत यावर कलापिनीच्या बालभवन व कुमारभवन या मुला-मुलींनी अतिशय सुंदर अशी नृत्ये सादर केली. ही नृत्ये अनघा कुलकर्णी, आरती पोलावार, शरदा भागवत आणि तेजस्विनी गांधी यांनी अनघा बुरसे व ज्योती गोखले यांच्या सहकार्याने बसविली होती.

कलापिनीचा कुमारभवन हा उपक्रम गेली ४ वर्षे उत्तम रीतीने चालू आहे. नाट्यसंस्कार कला अकादमीचे संस्थापक प्रकाश पारखी यांच्या मार्गदर्शनाखाली नाट्यसंस्कार कला अकादमी तर्फे नाट्य परीक्षा घेण्यात येतात. या वर्षी पहिली परीक्षा तळेगाव दाभाडे येथे कलापिनीच्या कुमारभवनच्या मुलांनी दिली. या परीक्षेला २५ मुले बसली होती. सर्व मुले उत्तम रीतीने उत्तीर्ण झाली. त्यामध्ये चित्रांशू तापस हा विद्यार्थी प्रथम आला. या परीक्षेचा अभ्यासक्रम घेण्यासाठी मीनल कुलकर्णी, डॉ अनंत परांजपे, श्रीधर कुलकर्णी, अंजली सहस्रबुद्धे आणि अनघा बुरसे यांनी मार्गदर्शन केले.

या परीक्षेच्या प्रमाणपत्रांचे वितरण या कार्यक्रमात करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून हरिश्चंद्र गडसिंग आणि प्रकाश पारखी होते. कार्यकारिणी सदस्य विनायक भालेराव यांच्या हस्ते हरिश्चंद्र गडसिंग यांचा सत्कार करण्यात आला. प्रकाश पारखी यांनी कलापिनीच्या सहकार्याने मावळ भागात अनेक नाट्यविषयक उपक्रम राबविण्याचा मनोदय व्यक्त केला, तसेच हरिश्चंद्र गडसिंग यांनी कलापिनीच्या उपक्रमांबद्दल समाधान व्यक्त केले आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले. डॉ अनंत परांजपे यांनी बालभवन आणि कुमारभवनच्या मुलांच्या पालकांना सक्रिय राहण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कलापिनीच्या उपाध्यक्षा अंजली सहस्रबुद्धे यांनी केले. श्रीधर कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला कार्यकारिणी सदस्य अशोक बकरे उपस्थित होते. तंत्रसाहाय्य चेतन पंडित, आदित्य धामणकर, विनायक काळे यांनी सांभाळले. ध्वनी संयोजन सुमेर नंदेश्वर यांचे होते. कार्यक्रमाला रवींद्र पांढरे, रश्मी पांढरे, दीपक जयवंत, श्रीपाद बुरसे, रामचंद्र रानडे तसेच बालभवन प्रशिक्षिका यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

या कार्यक्रमाचे लेखन लीनता आंबेकर-माडगूळकर यांनी, दिग्दर्शन अशोक आडावतकर, संकल्पना दीपाली निरगुडकर यांची होती, तर सूत्रधार प्रकाश पारखी होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.