Talegaon : माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘इंद्रायणी मॅरेथॉन’ स्पर्धेचे आयोजन

महाराष्ट्र कन्या ऑलिंपिक खेळाडू ललिता बाबर यांची प्रमुख उपस्थिती

एमपीसी न्यूज – मावळचे शिक्षणमहर्षी माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त ‘इंद्रायणी मॅरेथॉन 2018’ या स्पर्धचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शुक्रवारी (दि. 10) सकाळी आठ वाजता तळेगाव दाभाडे येथे होणार आहे. स्पर्धेची सुरुवात मारुती मंदिर चौक येथून होऊन इंद्रायणी कॉलेज येथे सांगता होणार आहे.

स्पर्धेचे अंतर सुमारे तीन किलोमीटर असून या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास महाराष्ट्र कन्या ऑलिंपिक खेळाडू ललिता बाबर उपस्थित राहणार आहेत. रोटरीचे 3131 चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. शैलेश पाळेकर, इंद्रायणी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू हर्षदा जोशी, राजेश पठाडे, नितीन म्हाळसकर यांचीही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष मावळ तालुक्याचे आमदार संजय भेगडे असणार आहेत.
स्पर्धा चार गटांमध्ये होणार आहे. त्यामध्ये इयत्ता 7 वी ते 10 वी मुले (प्रथम गट), इयत्ता 7 वी ते 10 वी मुली (व्दितीय गट), खुला गट पुरुष (तृतीय गट), खुला गट महिला (चतुर्थ गट) हे गट असणार आहेत. त्याचसोबत जेष्ठ नागरिकांसाठीचा विशेष गट देखील या स्पर्धेत धावणार आहे. प्रत्येक गटामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय असे तीन क्रमांक काढण्यात येणार आहेत. इयत्ता 7 वी ते 10 वी मुले व मुली प्रथम क्रमांकासाठी पाच हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी तीन हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी दोन हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. खुला गट महिला व पुरुष प्रथम क्रमांक 11 हजार, द्वितीय क्रमांक 7 हजार 500 आणि तृतीय क्रमांक 5 हजार. तर जेष्ठ नागरिक गटासाठी प्रथम क्रमांक सात हजार, द्वितीय क्रमांक पाच हजार, तृतीय क्रमांक तीन हजार रुपये रोख आणि चषक देण्यात येणार आहे.

प्रत्येक सहभागी स्पर्धकास स्पर्धेपूर्वी टि-शर्ट आणि स्पर्धेनंतर प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सहभागी शाळांना सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ स्पर्धेनंतर लगेचच संपन्न होणार आहे. स्पर्धेसाठी प्रवेश विनामूल्य असून मावळातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा, शाळांमधील विद्यार्थ्यांनी शाळेच्या क्रीडा शिक्षकांकडे तर खुल्या गटातील स्पर्धकांनी इंद्रायणी महाविद्यालयातील प्रा. सुरेश थरकुडे (9823773797), प्रा. प्रतिभा डंबीर (9545153484), गोरख काकडे (8180818091) यांच्याकडे पाच ऑगस्ट पर्यंत  नावे नोंदवावीत, असे आवाहन संयोजकांनी  केले आहे.
स्पर्धेचे संयोजन मावळ तालुका क्रशर संघटनेचे  अध्यक्ष तसेच रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीचे संस्थापक अध्यक्ष रो. विलास काळोखे व ला. संदीप काकडे हे करणार आहेत, अशी माहिती इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह रामदास काकडे यांनी नूतन अभियांत्रिकीमध्ये पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.