Talegaon : राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाकडून पुणे-मुंबई महामार्गावर दीड कोटींची दारू जप्त; दोघांना अटक

एमपीसी न्यूज – नाताळ आणि 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने मोठी कारवाई केली आहे. गोवा येथून महाराष्ट्रात येत असलेल्या कंटेनरची झडती घेत विदेशी दारूसाठा जप्त केला आहे. विदेशी दारूचे दोन हजार बॉक्स आणि कंटेनर असा एकूण एक कोटी 46 लाख 81 हजार रुपये किमतीचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. तसेच याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.

राजेश रत्नाकरन कुरुवाट (वय 28, रा कोलमपारा, कुरिक्कावल्लापील, किझमाला, करिंडालम, जि. कासारागोड, केरळ), विजित श्रीधरन कानीकुलथ (वय 28, रा. मदाथिल, कुडोल, बिरीकुलम, पाराप्पा रोड, जि. कासारगोड, केरळ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यांच्यासह वाहनमालक, मद्यसाठा पुरवठादार, वाहतूकदार, मद्य खरेदीदार व गुन्ह्याशी संबंध असलेल्या इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाला माहिती मिळाली की, नाताळ आणि 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर गोवा येथून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मद्यसाठा आणला जाणार आहे. हा मद्यसाठा जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून नेला जाणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार कुसगाव पथकर वसुली नाका येथे पोलिसांनी सापळा रचला. रविवारी पहाटे पथकर नाक्यावर 14 चाकी कंटेनर आला. पोलिसांनी या कंटेनरला तपासणीसाठी थांबवले.

कंटेनरमध्ये असलेल्या मालाविषयी चालकाकडे माहिती विचारली. तसेच त्याची कागदपत्रे मागितली. त्यावेळी चालकाने सांगितले की, म्हापसा गोवा येथून सिरॅमिक प्लास्टिक आइटम भरले असून ते ओशिवरा मुंबई येथे चालविले आहेत. त्याचवेळी राज्य उत्पादन शुल्कच्या दुसऱ्या पथकाने कंटेनरवरील क्लीनरला हीच माहिती विचारली असता क्लिनरने सांगितले की, मुंबई येथून सिरॅमिक प्लास्टिक आइटम भरले असून ते नांदेड येथे घेऊन जात आहोत. चालक आणि क्लीनर या दोघांच्या माहितीमध्ये तफावत आढळल्याने पोलिसांनी कंटेनरची तपासणी केली.

कंटेनरमध्ये गोवा बनावट विदेशी मद्याचे दोन हजार बॉक्स आढळले. पोलिसांनी हा मद्यसाठा आणि कंटेनर असा एकूण एक कोटी 46 लाख 81 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यावरून कंटेनर चालक आणि क्लीनर या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी वाहन मालक, मद्यसाठा पुरवठादार, वाहतूकदार, मद्य खरेदीदार व गुन्ह्याशी संबंधित असलेल्या इतर इसमांविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त प्राजक्ता वर्मा-लवंगारे, संचालक उषा वर्मा यांच्या आदेशानुसार उपविभागीय आयुक्त प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दीपक परब, प्रसाद सास्तुरकर, दुय्यम निरीक्षक प्रमोद कांबळे, सदाशिव जाधव, सुरेश शेगर, विशाल बस्ताव, तळेगाव दाभाडे येथील निरीक्षक राजाराम खोत, दुय्यम निरीक्षक नरेंद्र होलमुखे यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.