Talegaon : उघड्या दरवाजावाटे मोबाईल चोरी करणा-या चोरट्याकडून 70 मोबाईल जप्त; गुन्हे शाखा ‘युनिट पाच’ची कारवाई

एमपीसी न्यूज – उघड्या दरवाजावाटे मोबाईल चोरी करणा-या एका चोरट्याला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा ‘युनिट पाच’च्या पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे 6 लाख 72 हजार रुपये किमतीचे 70 मोबाईल फोन जप्त केले आहेत. या कारवाईमुळे तळेगाव एमआयडीसी, चाकण आणि देहूरोड पोलीस ठाण्यातील 12 गुन्हे उघडकीस आले आहेत. अन्य मोबाईलबाबत पोलीस तपास करीत आहेत.

शिवराज बाळासाहेब वाघोले (वय 19, रा. आगळेवस्ती, पाचाणे, चांदखेड, ता. मावळ) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.

याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी दयानंद खेडकर, राजकुमार ईघारे, फारूक मुल्ला, धनंजय भोसले तळेगाव एमआयडीसी परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना माहिती मिळाली की, आंबी चौकातील एका ढाब्याजवळ एक तरुण थांबला असून त्याच्याकडे चोरी केलेले मोबाईल फोन आहेत. तो चोरी केलेले मोबाईल विकण्यासाठी आला आहे. त्यानुसार, पोलिसांनी परिसरात सापळा रचून शिवराज याला ताब्यात घेतले.

शिवराज याच्याकडे असलेल्या पिशवीची तपासणी केली असता त्यामध्ये महागडे 30 मोबाईल आढळले. सर्व फोन हस्तगत करून त्याच्याकडे आणखी चौकशी केली असता त्याने घरी आणखी 40 मोबाईल ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी एकूण ६ लाख ७२ हजार रुपये किमतीचे 70 मोबाईल फोन जप्त केले.

या कारवाईमुळे तळेगाव एमआयडीसी, चाकण आणि देहूरोड पोलीस ठाण्यातील एकूण 12 गुन्हे उघडकीस आले आहेत. अन्य मोबाईल मालकांचा पोलीस शोध घेत आहेत. तळेगाव, तळेगाव एमआयडीसी, चाकण, म्हाळुंगे परिसरातून ज्यांचे मोबाईल चोरीला गेले आहेत. त्यांनी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक आयुक्त राजाराम पाटील, सहाय्यक आयुक्त श्रीधर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस कर्मचारी दयानंद खेडकर, राजकुमार इघारे, फारुक मुल्ला, संदीप ठाकरे, ज्ञानेश्वर गाडेकर, धनंजय भोसले, दत्तात्रय बनसुडे, धनराज किरनाळे, स्वामीनाथ जाधव, भरत माने, श्यामसुंदर गुट्टे, गोपाळ ब्रम्हांदे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.