Talegaon : सहलीवरून परतणाऱ्या बसची उसाच्या ट्रॅक्टरला धडक; 18 विद्यार्थ्यांसह 22 जखमी

एमपीसी न्यूज – अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील एका शाळेची सहल घेऊन जाणा-या बसची भर रस्त्यात उभारलेल्या उसाच्या ट्रॅक्टरला धडक बसली. या अपघातात बसमधील 18 विद्यार्थी, तीन शिक्षक आणि बसचालक असे एकूण 22 जण जखमी झाले. हा अपघात आज, बुधवारी (दि. 25) पावणेचारच्या सुमारास जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील तळेगाव खिंडीत झाला.

अनिकेत दत्तात्रय घुले (वय 12), दीपाली वालचंद गोडसे (वय 15), मानसी राजेंद्र शेटे (वय 15), साक्षी अरुण कोकणे (वय 14), सुदर्शन भाऊसाहेब खटाव (वय 13), प्राची अशोक गुंजाळ (वय 15), कार्तिकी शांताराम खताळ (वय 15), निकिता संदीप खताळ (वय 15), किरण सुखदेव कोकणे (वय 15), संदेश शांताराम खताळ (वय 14), तेजल रमेश आहेर (वय 15), धीरज बाबासाहेब खताळ (वय 14), शिवाजी रामभाऊ शेटे (वय 16), मयूर मीनानाथ खताळ (वय 13), सिद्धार्थ सुखदेव गोबणे (वय 13), चैताली संजय घुले (वय 16), प्रज्ञा संदीप खताळ (वय 16), वनिता संतोष देवगिरे (वय 15), शिक्षक सखाराम पांडुरंग भालेराव (वय 52), चांदसाब कसम अत्तार (वय 55), नाना हरिभाऊ बरडे (वय 59), बस चालक नईम रफिक शेख (वय 35) अशी जखमींची नावे आहेत.

याप्रकरणी बसचालक नईम रफिक शेख यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ट्रॅक्टर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील श्री बीजे खताळ जनता विद्यालय, धांदरफळ खुर्द या शाळेची सहल कोकण येथे गेली होती. अहमदनगर बस डेपोची बस (एम एच 14 / बी टी 4128) शाळेच्या सहलीसाठी देण्यात आली. या बसचे चालक फिर्यादी नईम शेख होते. शाळेतील 45 मुलांना घेऊन ही सहल सोमवारी (दि. 23) निघाली. यासोबत आगारातील आणखी एक बस (एम एच 14 / बी टी 4325) देखील या सहलीत होती. शाळेच्या दोन बसमधून सर्व विद्यार्थी निघाले.

पाली, खोपोली, रायगड मार्गे लोणावळ्याला ही सहल मंगळवारी (दि. 24) रात्री पोहोचली. त्यानंतर, लोणावळ्यातून पहाटे पावणेतीनच्या सुमारास जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून पुण्याकडे बस निघाली. तळेगाव दाभाडे येथील खिंडीजवळ बसच्या पुढे एक ट्रक जात होता. खिंडीजवळ आल्यानंतर ट्रकने अचानक डाव्या बाजूने मार्ग काढून ट्रक पुढे नेली.

त्यावेळी बस चालक शेख यांना समोर भर रस्त्यात उसाने भरलेला एक ट्रॅक्टर थांबलेला दिसला. ट्रॅक्टरच्या मागे कोणत्याही प्रकारचा रिफ्लेक्टर, इंडिकेटर न लावता निष्काळजीपणाने ट्रॅक्टर रस्त्यात लावला होता. त्यामुळे बसची ट्रॅक्टरला मागच्या बाजूने धडक बसली. या अपघातात बस चालक शेख यांना गंभीर दुखापत झाली, तर बसमधील नऊ विद्यार्थिनी आणि नऊ विद्यार्थी तसेच तीन शिक्षकांना देखील इजा झाली आहे.

घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिकांमधून जखमींना नजीकच्या दोन रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत. ट्रॅक्टर चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला असल्याचे शेख यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार, ट्रॅक्टर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.