Talegaon : शेताच्या कुंपणात वीजप्रवाह उतरल्याने शेळीसह व्यक्तीचा मृत्यू

A person along with a goat died due to electric shock in the field fence : कुंपणाजवळून जात असताना फिर्यादी यांचे वडील रामा पांडुळे आणि त्यांच्या शेळीला विजेचा धक्का बसला

एमपीसी न्यूज – एका शेताच्या कुंपणाच्या तारेमध्ये वीज प्रवाह उतरल्याने एका शेळीचा आणि एका व्यक्तीचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला. ही घटना 17 मे रोजी सकाळी नऊच्या सुमारास सोमाटणे गावच्या शिवारात घडली. याबाबत 20 जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामा पांडुळे, असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा काळू रामा पांडुळे (वय 35, रा. पारगाव, ता. पुरंदर. मूळ रा. मूर्टी, ता. बारामती) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार पोलिसांनी वसंत दत्तात्रय मोरे (रा. सोमाटणे, ता. मावळ) यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वसंत मोरे यांच्या शेतात बोअरवेल आहे. त्या बोअरवेलच्या मोटरला लाईटची सोय करण्यासाठी वसंत याने शेताजवळ असलेल्या लाईटच्या खांबावरून बेकायदेशीरपणे आकडा टाकून वीज घेतली.

दरम्यान, वसंत यांच्या निष्काळजीपणामुळे आकडा टाकलेली वायर शेताजवळ असलेल्या तारेच्या कुंपणाला चिकटली.

या कुंपणाच्या तारेत वीज प्रवाह उतरला. दरम्यान कुंपणाजवळून जात असताना फिर्यादी यांचे वडील रामा पांडुळे आणि त्यांच्या शेळीला विजेचा धक्का बसला. यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला.

याबाबत आरोपी वसंतच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 304 (अ), 429 सह भारतीय विद्युत कायदा 2003 चे कलम 135 नुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.