Talegaon : संत तुकाराम महाराज बीजेनिमित्त रंगला अभंगवाणीचा गजर

एमपीसी न्यूज – संत तुकाराम महाराज बीजेनिमित्त शाळा चौक येथील श्रीविठ्ठल मंदिर संस्थानामध्ये “अभंगवाणीचा कार्यक्रम रंगला. उद्योजक श्री संतोष दत्तात्रय खांडगे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. कलापिनी कला अकादमी आणि नादब्रह्म संगीत विद्यालय यांनी सादर केलेल्या “अभंगवाणी ” या कार्यक्रमाला रसिक भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

‘जय जय राम कृष्ण हरी’च्या गजराने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रचलित अभंगांबरोबरच अप्रचलित अभंगांचं सादरीकरण हे या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य होतं. मराठी अभंगरचनांबरोबरच संत गोपाळदासांची कर्नाटकी रचना आणि संत नामदेव रचित पंजाबी भजन त्याचबरोबर नाविन्यपूर्ण संगीतरचनांनी विठ्ठल मंदिराचा परिसर दुमदुमला होता.

  • सुप्रसिद्ध गायिका संपदा थिटे यांच्या सुरांनी या कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि त्यानंतर किरण परळीकर, विराज सवाई, सावनी परगी, स्वनिल झळकी यांनी त्यांच्या सादरीकरणाने भक्तिमय वातावरण निर्माण केले. किरण परळीकर यांनी सादर केलेल्या “तारू लागले बंदरी” या भैरवी रागातील अभंगाने कार्यक्रमाची सांगता झाली. दीपक जयवंत, रवींद्र पांढरे आणि अंकुर शुक्ल यांनी कोरसची साथ केली. संवादिनीची साथ प्रदीप जोशी आणि तबल्याची साथ मंगेश राजहंस यांनी केली. गोरख कोकाटे यांनी पखवाज वादनाने सर्वांची मने जिंकून घेतली. कोमल कोकाटे हिने टाळांची साथ केली.

माधुरी ढमाले-कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाचं ध्वनी संयोजन सुमेर नंदेश्वर यांनी केलं होतं. विशेष म्हणजे प्रतीक मेहता आणि चेतन पंडित यांच्या प्रयत्नांमुळे या संपूर्ण कार्यक्रमाचं फेसबुकच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण करण्यात आलं. शेवटी हभप ज्ञानेश्वर माऊली दाभाडे यांनी आभारप्रदर्शन केले. संपूर्ण कार्यक्रमाला रसिक भक्तांनी भरभरून प्रतिसाद दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.