Talegaon : उरुसावरून परतत असलेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू

एमपीसी न्यूज – वडगाव येथे मित्रांसोबत उरुसासाठी गेलेल्या तरुणाचा परतीच्या प्रवासात अपघाती मृत्यू झाला. तरुणाची दुचाकी रस्त्यावरील दुभाजकाला धडकल्याने हा अपघात झाला. ही घटना 23 एप्रिल 2019 रोजी घडली असून 22 ऑक्टोबर 2019 रोजी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस ठाण्यातून वर्ग करण्यात आल्याने तसेच नातेवाईकांच्या दिरंगाईमुळे गुन्हा दाखल करण्यास विलंब झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

विश्वास वसंत मेंगळे (वय 19, रा. बधलवाडी, रा. मावळ) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत जवळगी यांनी याप्रकारणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 एप्रिल 2019 रोजी विश्वास त्याच्या मित्रांसोबत वदावे मावळ येथे उरुसासाठी गेला होता. उरुसावरून मोटारसायकलवरून परत येत असताना वडगाव फाटा ते नवलाख उंब्रे रोडवर मॅग्ना कंपनीसमोर त्याची दुचाकी दुभाजकाला धडकली. यामध्ये विश्वास गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ उपचारासाठी तळेगाव येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, गंभीर इजा झाल्याने त्याला पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात हलवण्यात आले.

वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु असताना 28 एप्रिल रोजी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्यात आली. त्यानंतर पिंपरी पोलिसांनी हे प्रकरण तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात वर्ग केले. तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी नातेवाईकांचा शोध घेऊन याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. नातेवाईकांनी दिरंगाई केल्याने दाखल करण्यास विलंब झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.