Talegaon : किशोर आवारे हत्या प्रकरणातील आरोपींना आठ दिवस पोलीस कोठडी

एमपीसी न्यूज – जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष (Talegaon) किशोर आवारे यांच्या हत्या प्रकरणातील चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. यापैकी एकाला पुणे पोलिसांनी तर तिघांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्या. चारही आरोपींना शनिवारी (दि. 13) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना 20 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
रघु धोत्रे, आदेश धोत्रे, शाम निगडकर, संदीप मोरे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची शुक्रवारी (दि. 12) दुपारी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेसमोर निर्घृणपणे हत्या करण्यात आली. याप्रकरणी मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्यासह सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमदार सुनील शेळके, सुधाकर शेळके, संदीप गराडे, श्याम निगडकर (रा. तळेगाव दाभाडे) आणि श्याम याचे तीन साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी किशोर आवारे यांच्या आई, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Pune – पुणेकरांनी अनुभविला मोहन विणा आणि सात्विक वीणा वादनाचा आविष्कार
शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास किशोर आवारे नगरपरिषद कार्यालयात गेले असता तिथे श्याम निगडकर आणि त्याच्या तीन साथीदारांनी बंदुकीतून गोळ्या झाडून व कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने वार करून त्यांना ठार मारले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
हत्या केल्यानंतर आरोपी पळून गेले. आरोपींच्या शोधासाठी पिंपरी (Talegaon) चिंचवड पोलिसांनी विविध पथके रवाना केली. पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेचे खंडणी विरोधी पथक आणि गुन्हे शाखा युनिट दोन यांच्या पथकांनी रात्रभर मावळ परिसर धुंडाळून काढला. पहाटेच्या वेळी नवलाख उंबरे येथून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. पिंपरी चिंचवड पोलिसांनी दोन मारेकरी आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या एकाला अटक केली. तर पुणे पोलिसांनी नाना उर्फ संदीप मोरे याला अटक केली.
आरोपींना शनिवारी दुपारी वडगाव मावळ न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपींना 20 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींकडे चौकशीदरम्यान खुनाचे नेमके कारण आणि इतर बाबी समोर येतील. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.