Talegaon : दीड वर्षांपासून फरार असलेला खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात

Accused of murder, who has been absconding for a year and a half, is in the custody of the crime branch

एमपीसी न्यूज – तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यात मागील दीड वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने अटक केली. हा आरोपी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या टॉप 25 फरार आरोपींपैकी एक होता.

कमलेश हिरामण कदम (वय 23, रा. गोडुंब्रे, ता. मावळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दीड वर्षांपूर्वी खुनाची घटना घडली होती. त्यातील आरोपी कमलेश कदम अद्याप फरार होता.

दरम्यान, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी आयुक्तालयाच्या हद्दीतील फरार असलेल्या टॉप 25 आरोपींची यादी काढली होती. या टॉप 25 आरोपींना पकडण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या होत्या.

त्यानुसार, पोलीस ठाण्यासह गुन्हे शाखेचे पोलीस सर्व गुन्हेगारांची माहिती काढून तपास करीत होते. गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस कॉन्स्टेबल आतिष कुडके यांना माहिती मिळाली की, तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यातील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी कमलेश हा वाल्हेकरवाडी चिंचवड येथील चिंतामणी चौकात येणार आहे.

त्यानुसार, पोलिसांनी परिसरात सापळा लावला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. पोलिसांनी शिताफीने त्याला ताब्यात घेतले.

त्यांच्याकडे चौकशी केली असता त्याने खून केल्याचे कबुल केले. पुढील कारवाईसाठी आरोपीला तळेगाव दाभाडे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे एक) आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, उपनिरीक्षक संजय निलपत्रेवार, पोलीस कर्मचारी निकम, चौधरी, वेताळ, खरात, स्वामी, माने, खोमणे, दळे, मुंढे, तांबोळी, राऊत, सानप, कापसे, कुडके यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.